Indian Gava in Kolhapur : कोल्हापुरात गव्यांचा 'गवगवा' सुरुच; आता वडणगे परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन
कसबा बावडा परिसरातील विविध मळ्यात गव्यांच्या कळपाची लपाछपी सुरु असतानाच शनिवारी संध्याकाळी गवे वडणगे परिसरात दिसून आले. हा पाच गव्यांचा कळप असून त्यातीत दोन गव्यांची पूर्णत: वाढ झाली आहे.
Indian Gava in Kolhapur : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांच्या कळपांनी (Gava in kolhapur) निर्माण केलेली दहशत अजूनही कायम आहे. कसबा बावडा परिसरातील विविध मळ्यात गव्यांच्या कळपाची लपाछपी सुरु असतानाच शनिवारी संध्याकाळी गवे वडणगे परिसरात दिसून आले. हा पाच गव्यांचा कळप असून त्यातीत दोन गव्यांची पूर्णत: वाढ झाली आहे. वडणगे पोवार पाणंद मार्गावर बंडगर मळ्यातील ऊसाच्या शेतात गव्यांचा कळप ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी गेल्यानंतर बाळासाहेब काटे यांना दिसून आला. शेतकऱ्यांचा आणि ट्रॅक्टरचा आवाज आल्याने गव्यांनी पुन्हा एकदा ऊसाच्या शेतीत पळ काढला.
गव्यांच्या दर्शनाने भागात ऊसतोड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरात ऊसतोड मजुरांनी झोपड्या बांधून मुक्काम केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कसबा बावडा परिसरात गव्यांचा कळप दिसून येत होता. नदीकाठचा परिसर तसेच मुबलक चारा असल्याने गव्यांनी या पट्ट्यात तळ ठोकला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, मानवी वस्तीत गवे येऊ नयेत, यासाठी वनविभागाकडून डोळ्यात तेल घालून पहारा देण्यात येत असला, तरी गवे शेतातून मुक्काम सोडत नसल्याने यंत्रणेची झोप उडाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
गव्यांच्या कळपाची लपाछपी
दरम्यान, मंगळवारी, गव्यांच्या कळपाने कोल्हापूर शहरातील शंभर फुटी रोडवर ऊसाच्या फडाच्या शेतीत तळ ठोकलेला दिसून आला. एका शेतात सकाळच्या सुमारास गव्यांचा कळप गेल्याचे स्थानिकांनी पाहिल्यानंतर वनविभागाचे गस्त पथक तैनात करण्यात आले. खबरदारीचा भाग म्हणून अग्निशामक दल व पोलिसांचे पथकास पाचारण करण्यात आले. दोन आठवड्यांपूर्वी सहा गव्यांचा कळप पंचगंगा नदी काठच्या भागात आला होता. या कळपाने रमणमळ्यातील कडणे मळ्यात मुक्काम ठोकला होता. त्यानंतर तो कळप गायब झाला होता. त्यानंतर 15 दिवसांच्या आत गव्यांचा दुसरा कळप कोल्हापूर शहराच्या दिशेने आला आहे. त्यापूर्वी, हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर येथील गंधर्व या ठिकाणी गव्याचे दर्शन झाले.
इतर महत्वाच्या बातम्या