Raju Shetti on Uddhav Thackeray : तुमच्या गद्दारांना धडा शिकवायचा असेल, तर पाठिंबा द्यावा; राजू शेट्टींची उद्धव ठाकरेंना साद
Raju Shetti on Uddhav Thackeray : राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा मातोश्रीवर जाऊन भेट घेत चर्चा केली आहे.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या (21 मार्च) कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा पाठिंबा मिळावा, यासाठी साद घातली आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन पाठिंब्याबाबत चर्चा केली आहे.
तुमच्या गद्दारांना धडा शिकवायचा असेल, तर मला पाठिंबा द्यावा
तुमच्या गद्दारांना धडा शिकवायचा असेल, तर मला पाठिंबा द्यावा अशी साद राजू शेट्टी यांनी ठाकरे यांना घातली आहे. शेतकरी, शेतमजूर, उद्योजक यांचा खणखणीत आवाज संसदेमध्ये जावा अशी इच्छा असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले. शेट्टी यांनी आतापर्यंत दोनवेळा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, अजूनही ठाकरे यांच्याकडून याबाबत हिरवा कंदील आला नसला तरी जागावाटपामध्ये हातकणंगलेची जागा त्यांच्या वाट्याला आल्यास ते राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकतात अशी शक्यता आहे.
धैर्यशील माने यांच्यावर राजू शेट्टी यांनी तोफ डागली
दरम्यान, राजू शेट्टी यांनी ठाकरे यांचा पाठिंबा जाहीरपणे मागितला असला, तरी महाविकास आघाडीमध्ये येणार नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नसल्याने आम्ही पाठिंबा मागत असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, खासदार धैर्यशील माने यांच्यावर राजू शेट्टी यांनी तोफ डागली. विकासकामांवरून धैर्यशील माने यांनी होर्डिंग लावली होती. मात्र, ती किती होर्डिंग शिल्लक आहेत ते जाऊन बघावीत असा टोला त्यांनी धैर्यशील माने यांना लगावला.
शेट्टी मातोश्रीवर पोहोचल्यानंतर ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, शेट्टी यांनी गेल्या 25 वर्षांपासून मी पक्षाच्या चिन्हावर लढत असल्याचे सांगत नकार दिला होता. संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली असून आयुष्यात इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली नसल्याचे ठाकरे यांना सांगितले होते. हातकणंगलेत ठाकरेंनी पाठिंबा दिल्यास बदल्यात राज्यात ठाकरेंना मदत करण्याचा शब्द राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या