Hasan Mushrif :....तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊ, अलमट्टी प्रश्नासंदर्भात मुश्रीफांनी मांडली भूमिका
Hasan Mushrif, Kolhapur : पुन्हा एकदा मंत्री झालेल्या हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात आल्यानंतर करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.
Hasan Mushrif, Kolhapur : मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी एकत्रपणे करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक देखील उपस्थित होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अलमट्टी प्रश्नसंदर्भात आपण केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याची माहिती दिली.
आई अंबाबाई आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाले. आम्ही जे हातामध्ये काम घेणार आहोत ते प्रामाणिकपणे आणि जनतेच्या हिताचे असेल. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. त्या कामांमध्ये आम्हाला यश प्राप्ती द्यावे असा संकल्प आम्ही अंबाबाई देवीसमोर केला आहे. असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात येताच करवीर दिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्नांना आम्ही हात घालणार आहोत, आणि ते मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बहुमत आमच्या मागे आहे. त्यामुळे कामे करण्यास कोणतीही अडचणी येणार नाही. असे सांगत छगन भुजबळ यांची नाराजी आम्ही निश्चितपणे दूर करू ते आमचे जेष्ठ नेते आहेत, असे स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफ यांनी दिले
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यावरून बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी, अलमट्टी धरणाच्या कृष्णा संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू . कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे कसे रोखता येईल यासाठी पाठपुरावा करू. हे शक्य नाही झालं तर आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक लावण्याची मागणी करू असे देखील मुश्रीफ म्हणाले आहेत.
काळमवाडी दूधगंगा धरण गळती प्रकरणी आणि थेट पाईपलाईनच्या गळतीवर बोलताना मुश्रीफ यांनी थेट बोलणे टाळत,आजच आम्ही कोल्हापूरला आलो आहोत, गळती काढण्याच्या कामाचे टेंडर निघाले आहे.वेळेत काम करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. असे स्पष्टीकरण दिले. शक्तिपीठ महामार्ग वरून बोलताना, कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचे काम रद्द झाल्याचे राजपत्र निघालेला आहे. सांगली पर्यंत काम होणार असं मुख्यमंत्री बोललेले आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या