Hasan Mushrif : पत्रकारांचे आभार मानतो तुम्ही चार जागा म्हणता, पण तीनच जागा मिळतील अशी चर्चा! मुश्रीफ थेट बोलल्याने राष्ट्रवादीने हात टेकले?
Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांनी यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यानंतर आता अजित पवार गटाला (Ajit Pawar) नेमक्या जागा मिळणार तरी किती आणि त्या कोणत्या असणार याचीच चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर : राज्यात महायुतीच्या जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing In Maharashtra) ठिणगी पडली असतानाच आता अजित पवार गटातील मातब्बर नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यानंतर आता अजित पवार गटाला (Ajit Pawar) नेमक्या जागा मिळणार तरी किती आणि त्या कोणत्या असणार याचीच चर्चा रंगली आहे. आज हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) बोलताना थेट पत्रकारांचेच आभार मानले. ते म्हणाले की मी तुमचे आभार मानतो तुम्ही चार जागा मिळतील असे म्हणत आहात. मात्र, आम्हाला तीनच जागा मिळतील अशी चर्चा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे एक प्रकारे जागा वाटपामध्ये अजित पवार गटाने भाजपसमोर हात टेकले आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आमदार निलेश लंके शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना हसन मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, निलेश लंके यांना लोकसभा लढवायची आहे. मात्र, जागा भाजपला जाणार असल्याने ते निर्णय घेत असावेत, असे त्यांनी यावेळी नमूद केले. निवडणुका सुरू झाल्यानंतर माणसे येत असतात, जात असतात. मात्र, पक्ष तिथेच राहतो असं त्यांनी यावेळी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गावर मुश्रीफ काय म्हणाले?
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होत आहे. प्रत्येक गावातून विरोध वाढत चालल्याने हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या भावना या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना कळवू अशी भूमिका मांडली. ते म्हणाले की, हा मार्ग सुपीक जमिनीतून होणार नाही यासाठी प्रयत्न करू. दरम्यान अजित पवार गटाची जागावाटपावरून नाराजी समोर आली असतानाच दुसऱ्या बाजूने शिंदे गटाच्याही काही जागांवर भाजपकडून दावा करण्यात आल्याने महायुतीमध्ये जागा वाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आलं आहे. भाजपने अंतर्गत सर्वेचा दाखला देत शिंदे गटाच्या सुद्धा पाच जागांवरती दवा केला आहे.
कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा
यामध्ये कोल्हापूरमधील सुद्धा दोन्ही जागांचा समावेश आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. शिंदे गटातील खासदारांविरोधात अंतर्गत सर्व असल्याने त्या ठिकाणी आता भाजपने चाचपणी सुरू केली आहे. कोल्हापूर लोकसभेला धनंजय महाडिक आणि समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर हातकलंगलेमधून शौमिका महाडिक, राहुल आवाडे आणि विनय कोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपामध्ये कोल्हापूरच्या जागा शिंदे गटालाच राहणार की अजित पवार गट काही मागणी करणार की भाजप आपला दावा मान्य करून आपल्याच पदरात पाडून घेणार? याकडे तर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.महायुतीची जागावाटप संदर्भातील बैठक पुन्हा एकदा अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आहे.
अमित शाहांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीत जागावाटप निश्चित होण्याची शक्यता आहे. जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा दिल्ली गाठली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार याकडे जाता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या