Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या; आमदार पी. एन . पाटील यांची विधानसभेत मागणी
Kalammawadi Dam: धोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती लवकर होणार का? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे आणि तातडीने निधी मंजूर करून निविदा काढावी अशी मागणी आमदार पीएन पाटील यांनी केली.
Kalammawadi Dam: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kalammawadi Dam) काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्यावर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला फटका बसला. या धरणाला गळती लागल्यामुळे धरण धोक्यात असून दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी आमदार पी.एन. पाटील यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
काळम्मावाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 28 टीएमसी असून या धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी प्रतिसेकंद 650 लिटर्स पाणी गळती होते. ही गळती एक वर्षात काढणार असून 84 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि निविदा काढणार आहे, असे सांगून काही अधिकाऱ्यांनी तीस टक्के पाणीसाठा कमी केला होता. मात्र, पावसाला उशीर झाल्याने ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. जनतेला प्यायलाही पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.
मात्र, गेल्या वर्षभरात या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही. शाहू जयंती दिवशी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पाणीटंचाई का निर्माण झाली? असा प्रश्न उपस्थित केला असता या कामासाठी टेंडरच मंजूर झाले नसून 84 कोटींचे पुन्हा टेंडर काढणार असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी पुन्हा या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला जाणार आहे, त्यामुळे पुन्हा यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
धरण फुटल्यावर काम होणार का?
या धरणाला धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे धोका असूनही कामच व्हायला तयार नाही. धरण फुटल्यावर काम होणार का? असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी धरण फुटलं आहे तेथील जनतेचे हाल झाले आहेत. धोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती लवकर होणार का? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे व तातडीने निधी मंजूर करून निविदा काढावी अशी मागणी पाटील यांनी केली. या मागणीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
इतर महत्वाच्या बातम्या