Eknath Shinde : कोल्हापुरातील दोन्ही सीटसाठी मुख्यमंत्र्यांची थेट गोकुळमध्ये फोनाफोनी! अध्यक्ष अरुण डोंगळेंना शिंदेंनी काय सांगितलं? शब्द जसाच्या तसा
कोल्हापुरातील शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या मागे गोकुळची ताकद राहावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना फोन केला आहे.
कोल्हापूर : आमदारकी नको, पण गोकुळचे (Gokul) तिकीट द्या अशी म्हण कोल्हापूरच्या (kolhapur) सहकार क्षेत्रात चांगलीच प्रचलित आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या थेट चुलीशी संबंध असलेल्या गोकुळची ताकद सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे 3 हजार कोटींवर वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळमध्ये आपलाच संचालक करण्यासाठी किंवा आपलीच सत्ता असण्यासाठी कोल्हापूरच्या नेत्यांची सुरू असणारी प्रयत्नांची पराकाष्ठांनी कधीच लपून राहिलेली नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या मागे गोकुळची ताकद राहावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना फोन केला आहे. सीएम एकनाथ शिंदे आणि डोंगळे यांच्या फोनची ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये चांगलीच व्हायरल झाली आहे.
या व्हायरल क्लिपला एकनाथ शिंदे आणि अरुण डोंगळे यांचा फोटो लावण्यात आला आहे. सीएम शिंदे यांनी अरुण डोंगळे यांना कोणता संदेश दिला हे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होत आहे. व्हायरल क्लिपला सीएम एकनाथ शिंदे कॉलिंग डोंगळे साहेब असं शब्द देण्यात आले असून दोघांचे फोटो आहेत.
दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला?
एकनाथ शिंदे : हॅलो
अरुण डोंगळे : साहेब, नमस्कार
एकनाथ शिंदे : नमस्कार, नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय
अरुण डोंगळे : आम्ही पूर्ण गोकूळची ताकद दोन्ही सीटच्या मागे लावत आहोत. कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचा प्रयत्न करत आहोत. हे सांगण्यासाठीच काल मी आपल्याला शाखेला भेटायला आलो होतो परंतु भेट झाली नाही
एकनाथ शिंदे : बरं बरं
अरुण डोंगळे : पूर्ण ताकद लावत आहोत, 15 तारखेला फाॅर्म भरत आहोत
एकनाथ शिंदे : संजयला पूर्ण ताकदीने मदत करायची आहे
अरुण डोंगळे : शंभर टक्के मदत करतोय, काळजी करू नका, गोकूळची पूर्ण ताकद आम्ही लागेल याची व्यवस्था करतोय
एकनाथ शिंदे : ओके थँक्यू
अरुण डोंगळे : ओके साहेब
गोकुळवर सत्ता कोणाची?
गोकुळ दूध संघावर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. कोल्हापूरच्या राजकारणातील ही जोडगोळी आता महाविकास आणि महायुती अशा गटात विभागली गेली आहे. सतेज पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा आहे, तर महायुतीच्या प्रचाराची धुरा हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. दोन्ही नेते गोकुळमध्ये एकत्र असले, तरी लोकसभेला एकमेकांविरोधात आहेत. त्यामुळे गोकुळची ताकद विशेष करून संजय मंडलिक यांच्यामागे राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोर लावला आहे. गोकुळच्या विद्यमान संचालकांपैकी सर्वाधिक संचालक कोल्हापूर लोकसभेच्या कार्यक्षेत्रातील आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या