Kolhapur News: गौण खनिज वाहतूक वाहनांवर 'जीपीएस' न बसवल्यास तीन लाखांचा दंड; वाहनधारकांकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे वाहतूक करताना जीपीएस सिस्टम बसवणं आवश्यक असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अन्यथा तीन लाखाचा दंड भरण्यास तयार रहावे, असा इशाराच देण्यात आला आहे.
Kolhapur News: महाराष्ट्र सरकारच्या महसूल व वन विभागाकडून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांस जीपीएस डिव्हाईस बसवून वाहतूक करण्यास 1 मे 2023 पासून बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे वाहतूक करताना जीपीएस सिस्टम बसवणं आवश्यक असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आदेशानुसार गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर 'जीपीएस आवश्यक असून जो वाहनधारक बसवणार नाही, त्यांना तीन लाखाचा दंड भरण्यास तयार रहावे, असा इशाराच अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी दिला आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील खाणपट्टाधारक व कुशरधारकांची आज सर्व विषयांवर चर्चा झाली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले की, राज्यात गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले असून हेच नियम कोल्हापूर जिल्ह्यात तंतोतंत पाळले जावेत. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर 1 मे पासून जीपीएस बंधनकारक आहे. अजूनही अनेक वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित नसून अशा वाहनधारकांविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल. त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले की, जीपीएस वाहनधारकांना 5 ते 7 हजारपर्यंत मिळू शकते. दंडाच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. त्यामुळे वाहनधारकांनी ती आपल्या वाहनावर बसवून घ्यावी. जीपीएस बसवणार नसाल तर कारवाई केलीच जाईल.
जीपीएस कसे असावे?
वाहनांसाठी बसविण्यात येणारे जीपीएस डिव्हाईस हे Automotive Research Association of India (ARAI) द्वारे प्रमाणित Standard 140 (AIS-140 IRNSS) यांचेच असावे. वाहनमालकाने जीपीएस प्रणाली बसवल्यानंतर शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा.लि. यांचे (020-67800800) या दुरध्वनीवर संपर्क साधून जीपीएस महाखनिज प्रणालीसोबत तत्काळ आपल्या स्तरावर लिंक करून घ्यावे.
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांस जीपीएस बसवून वाहतूक करण्यास 1 मेपासून प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नंतर गौणखनिज वाहतूक करणाऱ्या कोणत्याही वाहनास महाखनिज प्रणालीमधून E-TP (निर्गत वाहतूक पास) Generate केले जाणार नाहीत व अशा वाहनाने गौण खनिज वाहतूक केल्याचे आढळून आल्यास ते अवैध समजले जाईल. त्यामुळे सर्व गौणखनिज खाणपट्टा धारक व खाण परवानाधारक यांनी गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनास ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार जीपीएसबसवून गौणखनिज वाहतूक करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या