(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti: राजू शेट्टींनी इशारा देताच सीएम एकनाथ शिंदेंकडून बैठकीचे आयोजन; स्वाभिमानीकडून दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बैठकीचं आश्वासन दिल्याने स्वाभिमानीने आंदोलन स्थगित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 15 जून रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली आहे.
Raju Shetti: ऊस दर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नसल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सकाळी पोहोचले व आंदोलन करू नये असे आवाहन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बैठकीचं आश्वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 15 जून रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे, बैठकीत निर्णय न झाल्यास शासन आपल्या दारी कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
एबीपी माझाने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांची लूट थांबवावी अन्यथा बी बियाण्यांची दुकाने फोडून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटली जातील, असा इशारा दिला आहे. बी बियाणे आणि खत विक्रेते हे केवळ प्यादे आहेत, या भ्रष्टाचाराची लिंक कुठपर्यंत पोहोचली त्याचा शोध घेतला पाहिजे, असेही म्हटले आहे.
प्रोत्साहान अनुदान अजूनही नाही
राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने गेल्या 14 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्याप दिलेली नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तातडीने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणेसंदर्भात आदेश व्हावेत. राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी मागणी केली आहे. ऊस दर समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी गेल्या दोन हंगामातील अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रूपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या