Kolhapur News: कोल्हापुरात 'वाद' आपल्या दारी; रस्त्यावर एसटी गायब झाल्याने प्रवाशांचा तीव्र संताप, मुख्यमंत्र्यांची स्वागत कमानही मनपाने हटवली
कोल्हापुरात आज तपोवन मैदानात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम आज (13 जून) पार पडत आहे. मात्र, या कार्यक्रमाला कोल्हापुरात सकाळपासूनच वादाचे गालबोट लागलं आहे.
Kolhapur News: दोनवेळा तयारी करूनही कार्यक्रम पुढे ढकलल्यानंतर कोल्हापुरात आज तपोवन मैदानात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम आज (13 जून) पार पडत आहे. मात्र, या कार्यक्रमाला कोल्हापुरात सकाळपासूनच वादाचे गालबोट लागलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्वच दैनिकांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे भाजपचा चांगलाच तीळपापड झाला आहे. त्यामुळे ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी थेट कोल्हापूर रद्द केल्याची चर्चा रंगली आहे.
एसटी नसल्याने प्रवाशांचा संताप
हा राजकीय वाद असतानाच गर्दी जमवण्याचे मोठे टार्गेट असल्याने जिल्ह्यातील 700 एसटी बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी बुकिंग करण्यात आल्या आहेत. मात्र, याचा थेट परिणाम हा सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे अनेक बसस्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. त्यामुळे बराच काळ बसस्थानकामध्ये अडकून पडल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी एसटी का नाही? अशी विचारणा करत आक्रमक पवित्रा घेतला. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकातून एसटी बुकिंग करण्यात आल्या आहेत. सकाळपासून लांब पल्ल्यावर जाणाऱ्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच काँग्रेसकडून बस स्थानकात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
सायबर चौकातील स्वागत कमान हटवली
हे कमी म्हणून की काय सायबर चौकातील मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेली कमानही वाहतुकीसाठी अडथळा होऊ लागल्याने ती हटवण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मृलन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी कमान हटवली. तो सुद्धा नंतर शहरात चर्चेचा विषय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळ ते तपोवन मैदानापर्यंत ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. मात्र, सायबर चौक येथील कमाल वाहतुकीसाठी अडथळा होत असल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाने आणि पोलिसांनी कारवाई करत हटवली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाचे शिवसैनिक करणार प्रश्न
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाचे शिवसैनिक प्रश्न विचारणार आहेत. लोकशाही पद्धतीने आम्हाला प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. निवेदन न देता जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यावर ठाकरे गटाचे शिवसैनिक ठाम आहेत. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांन विनंती पत्र देण्यात आलं आहे. शेतकरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्न घेऊन कार्यक्रमात जाणार असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. तथापि, जिल्हाधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना अद्याप परवानगी दिलेली नाही.
दरम्यान, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये 30 हजारांवर लाभार्थी उपस्थित राहतील, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, देवेंद्र फडणीस यांनी अचानक रद्द केलेला दौरा यामुळे कोल्हापुरातील भाजप कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या