Amit Thackeray : अमित ठाकरेंचा कोल्हापुरात 'राज'कीय चर्चेला फाटा; म्हणाले, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याला माझे प्राधान्य
Amit Thackeray in Kolhapur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यात राजकीय चर्चेला फाटा देत विद्यार्थ्यांचे प्रश्न व पक्षवाढीसंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आल्याचे सांगितले.
Amit Thackeray in Kolhapur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे (Amit Thackeray in Kolhapur) यांनी कोल्हापूर दौऱ्यात राजकीय चर्चेला फाटा देत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि पक्षवाढीसंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आल्याचे सांगितले. अमित ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मेळावा उद्यमनगरातील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएसनच्या हॉलमध्ये घेतला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक, व्यक्तिगत प्रश्नही समजून घेतले.
अमित ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा राज्यभरातील प्रत्येक महाविद्यालयाबाहेर काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न, अपेक्षा आणि पक्षवाढीसंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी येथे आलो आहे. राजकीय घटना-घडामोडींवर भाष्य करण्यासाठी येथे आलेलो नाही, तर विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याला माझे प्राधान्य असेल." अमित ठाकरे यांनी सांगितले की, "मुंबईत 150, तर पुणे, ठाणे व मराठवाड्यात विद्यार्थी सेनेच्या शाखा स्थापन झाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यांत हे काम सुरु आहे. विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, परीक्षांतील त्रुटीचे विषय असे अनेक प्रत्येक महाविद्यालयाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ते सोडवण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखा काम करतील."
अंबाबाई देवीचे घेतले दर्शन
अमित ठाकरे यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट दिली. तसेच न्यू कॉलेज, विवेकानंद महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अमित ठाकरेंनी घेतली उदयनराजेंची भेट
अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या विस्तारासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येण्यापूर्वी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत उदयनराजे यांनी दिलखुलास स्वागत करताना आपल्या खास मित्राचा मुलगा घरी आल्याने आपलाच मुलगा घरी आल्यासारखं वाटल्याचे त्यांनी सांगितले.
उदयनराजे म्हणाले की, "केवळ अमित ठाकरे नव्हे, तर इतर तरुणांनीही राजकारणात आलं पाहिजे. त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा केली पाहिजे ठाकरे कुटुंबाला प्रबोधनकारांपासून वारसा आहे. ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे. प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब असतील, राज ठाकरे असतील, या सर्वांचा नावलौकिक त्यांनी केला पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे." त्यांची फॅन फॉलोईंग जोरदार असल्याचे ते म्हणाले. माझ्या अमितसाठी सदिच्छा असून त्याच्या हातून मोठं कार्य होऊदे असेही उदयनराजे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या