Eknath Shinde : कोल्हापूरमधील प्रकाश आबिटकरांनंतर आता मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर देखील एकनाथ शिंदेंच्या गळाला!
कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सुद्धा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जाऊन मिळाले आहेत. विमानतळावरील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते कैद झाले आहेत.
Eknath Shinde : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या हादऱ्यानंतर शिवसेनेला अजून किती धक्के बसणार ? याबाबत चर्चा अजूनही होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. विमानतळावरील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते कैद झाले आहेत.
यापूर्वी काल सुरतमधील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून आले होते. मात्र, राजेंद्र पाटील-यड्रावकर त्यावेळी मुंबईत मुंबईमध्ये होते, पण आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर सुद्धा हे गुवाहाटीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही आमदार शिंदे यांच्या गटाला मिळाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर काल नॉटरिचेबल होते. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे स्पष्ट झाले. काल राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि शिवसेना खासदार संजय मंडलिक एकाच गाडीतून मुंबईसाठी रवाना झाले होते.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते की, माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही किंवा माझा कुणाशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे नेमकं काय झालं आहे हे कळल्याशिवाय बोलणं योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, आता ते गुवाहाटीत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर तसेच शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात शिवसेनेमध्ये पोकळी निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण, कोल्हापूर जिल्ह्यातील 5 माजी शिवसेना आमदार गोव्यामध्ये पोहोचले आहेत आणि ते सुद्धा शिंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता शिवसेनेची परिस्थिती काय असेल? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या