(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Worst Road : एबीपी माझाच्या दणक्यानंतर अवघ्या 15 दिवसांत उखडलेल्या दगडांवर पुन्हा पॅचवर्क
कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या भयानक अवस्थेवर मलमपट्टी म्हणून पॅचवर्क करण्यात येत आहे. सुभाष रोड ते हाॅकी स्टेडियम रोड जोडणाऱ्या चौकात महाकाय असा खड्डा पडला होता.
Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या भयानक अवस्थेवर मलमपट्टी म्हणून पॅचवर्क करण्यात येत आहे. सुभाष रोड ते हाॅकी स्टेडियम रोड जोडणाऱ्या चौकात महाकाय असा खड्डा पडला होता. या खड्ड्यामध्ये करण्यात आलेले पॅचवर्क अवघ्या 15 दिवसांमध्येच पूर्णत: उखडून गेले होते. एबीपी माझाने याबाबत 22 नोव्हेंबर रोजी या दगडी कारभाराचे वाभाडे काढताना वृत्त प्रसिद्ध केले होते. एबीपी माझाच्या दणक्यानंतर उखडलेल्या दगडांवर पुन्हा पॅचवर्क करण्यात आले आहे.
उखडलेल्या पॅचवर्कचे ठेकेदाराकडून करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली होती. नेत्रदीप सरनोबत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले होते की, संबंधित मार्गावर ड्राय बेस घेऊन खडी मारली आहे. ड्राय बेसवर तातडीने लेअर घ्यायला हवी, पण ते करत असताना मंजूरी नसतात, बजेट नसते त्यामुळे अडचण निर्माण होत आहेत.
पॅचवर्कच्या कामात गुणवत्तेचा अभाव
दरम्यान, ठेकेदारांकडून तसेच महापालिकेकडून होत असलेल्या कामाची पॅचवर्क कामाची पाहणी महापालिकेतील उपायुक्तांकडून होत आहे. मात्र, सरनोबत यांनी टेक्निकल लोकांना नाॅन टेक्निकल काम आणि नाॅन टेक्निकल लोकाना टेक्निकल काम दिलं जात असल्याचे एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे या पॅचवर्कची पाहणी अधिकाऱ्यांकडून झाली असेल, तर कोणत्या धर्तीवर पाहणी केली? त्यासाठी काय निकष ठरवण्यात आले होते. इंडियन रोड मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आणि बांधणीच्या निकषांची माहिती ठेकेदारांना देण्यात आली होती की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे तटस्थ यंत्रणेमार्फत पाहणीचे काम का करून घेतले जात नाही? याबाबत आता विचार करण्याची गरज आहे.
कोल्हापूर शहरात अजूनही बऱ्याच मार्गावरील पॅचवर्कचे काम प्रलंबित आहे. ड्राय पद्धतीने पॅचवर्क करण्यात येत असल्याने अनेक मार्गावर पॅचवर्क केलेल्या खडी बाजूला झाल्याने प्रवास जीवघेणा झाला आहे. बाजूला झालेल्या खडीवरून दुचाकी स्लीप होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य
ड्राय पद्धतीच्या पॅचवर्कमुळे शहरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर पाठिमागे धुळीचे लोट तयार होत असल्याने डोळ्यांच्या विकारांना सुद्धा आमंत्रण मिळत आहे.
दर्जेदार पॅचवर्कसाठी मोठ्या निधीची आवश्यकता
कोल्हापूर शहरात सगळे मिळून 1031 किमी रस्ते आहेत. यामधील तब्बल अमृतजल योजनेसाठी 378 किमी रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. ही खुदाईल अडीच ते तीन फुटांनी रस्ते उकरण्यात आले आहेत. मात्र, त्या कामावर अजूनही पॅचवर्क झालेलं नाही. कोल्हापूर शहरातील विविध योजनांच्या माध्यमातून 170 ते 200 किमीचे रस्ते करण्यात आले आहेत. या रस्त्यांची अवस्था तुलनेत बरी आहे. अन्य मार्गावर अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे दर्जेदार पॅचवर्कसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे.