(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : कोल्हापुरातही मराठा आरक्षणसाठी ठिणगी पडली; पुढाऱ्यांना गावबंदी सुरु, 'फसवे शासन चले जाव' आंदोलन
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दोन आणि कागल तालुक्यातील एका गावामध्ये मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी ठिणगी पडली आहे.
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना, आमदार, खासदार तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मराठा समाजाकडून गावबंदी केली जात असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Maratha Reservation agitation in Kolhapur) सुद्धा त्याचे पडसाद उमटत आहेत.
लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दोन आणि कागल तालुक्यातील एका गावामध्ये मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीतच कोल्हापूरमध्ये सुद्धा आता मराठा आरक्षणासाठी ठिणगी पडली आहे. कागल तालुक्यातील हळदवडेत सकल मराठा समाजाने मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियातून त्यांनी दिली आहे. याबाबतीत लवकरच डिजिटल फलक लावणार आहेत.
खिंडी व्हरवडे, आमजाई व्हरवडे गावाने केली पुढाऱ्यांना गावबंदी
राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे आणि आमजाई व्हरवडे गावाने सुद्धा मराठा आरक्षण प्रश्नी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा असं या फलकातून सांगण्यात आलं आहे. हा बोर्ड लावण्यात आल्यानंतर आता इतर गावांमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा, दर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्व्हे करून प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढा, सारथीमार्फत पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी येथून पुढे सर्व निवडणूक मतदानावर मराठा समाजाकडून बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. लवकरच याबाबत या दोन्ही गावांमध्ये सर्वपक्षीय व ग्रामस्थांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
फसवे शासन चले जाव आंदोलन
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने मागितलेली मुदत 24 तारखेपर्यंत होती. त्याबरोबर राज्य शासनाची विश्वासार्हता संपली आहे. त्यामुळे आज (26 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजता कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फसवे शासन चले जाव आंदोलन सकल मराठा समाजाकडून करण्यात येणार आहे. आंदोलनाला मराठा समाजातील बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आरक्षणासाठी लढाईची तीव्रता वाढवण्यासाठी निर्णय आणि आंदोलनाचे पुढील टप्पे यावेळी जाहीर केले जातील, अशी माहिती मराठा समाजाकडून दिलीप देसाई यांनी दिली आहे.
तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये
दुसरीकडे, जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील कावळे यांनी मुंबई आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर प्रचंड मानसिक आघात झाला आहे. मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. सुनील कावळे यांना आदरांजली वाहताना समाजातील तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी निवेदनातून केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या