Kolhapur Ganesh Immersion : पंचगंगेत एकही मूर्ती विसर्जित न झाल्याने घेतला मोकळा श्वास, इराणी खणीत 1081 गणेश मूर्तींचे विसर्जन
Kolhapur Ganesh : तब्बल 28 तास... डाॅल्बीचा अखंड दणदणाट.... झगमगणारी लेझर लाईट आणि 30 तासांच्या पोलिस बंदोबस्तात कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणूक पार पडली. ही मिरवणूक पाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला होता.
Kolhapur Ganesh Immersion : तब्बल 28 तास... डाॅल्बीचा अखंड दणदणाट.... झगमगणारी लेझर लाईट आणि 30 तासांच्या पोलिस बंदोबस्तात कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणूक पार पडली. ही मिरवणूक पाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला होता. त्यामुळे मुख्य मार्गावर अनेकवेळा चेंगराचेंगरी, मंडळ आणि तालमींची खुन्नस दिसून आली.
पोलिसांकडून मंडळांविरोधात कोणतीही ठाम भूमिका न घेतल्याने डाॅल्बीचा अखंड दणदणाट झाला. मध्यरात्री डाॅल्बी बंद करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच झोपत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पुन्हा सुरु केला आणि मिरवणूक पुन्हा सुरु झाली. दुसरीकडे शिवाजी चौकातील महागणपणीचेही उत्साहात विसर्जन करण्यात आले.
पंचगंगेत एकाही मूर्तीचे विसर्जन नाही, पालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत
मनपा प्रशासनाकडून घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी शहरात ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीवेळी सार्वजनिक मंडळांनी 161 गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी अर्पण केल्या. महापालिकेच्या मूर्ती अर्पण आवाहनास सार्वजनिक मंडळांनी प्रतिसाद देत 161 मूर्ती पर्यावरणपूरक अर्पण केल्या, तर 920 गणेश मुर्ती सार्वजनिक मंडळांनी स्वत: विसर्जित केल्या. पंचगंगेत एकही मूर्ती विसर्जित झाली नाही. महापालिकेला अर्पण केलेल्या व सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या अशा 1081 गणेश मुर्ती इराणी खाणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी आभार व्यक्त केले.
हे विसर्जन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी,आरोग्य, सफाई , विद्युत कर्मचारी, वैद्यकीय पथक, बचत गट, व्हाइट आर्मी, महाराष्ट्र फोर्स, जीवन ज्योत संघटना, हमाल, क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी सलग दोन दिवस अहोरात्र काम केले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार प्रशासकाने व्यक्त केले.
याचबरोबर विभागीय कार्यालय अंतर्गत ठेवण्यात आलेल्या 25 कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये 1273 घरगुतीमुर्ती अर्पण करण्यात आल्या होत्या या सर्व घरगुती गणेश मुर्ती इराणी खण येथे पर्यावण पुरक विसर्जित करण्यात आल्या.
महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व इतर अडथळे हटविण्यात आले होते. विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते.
इराणी खण व तांबट कमान येथे 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून विर्सजन स्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. याठिकाणी वैद्यकिय पथके नेमण्यात आली होती. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मुर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे 13 तराफे व 4 क्रेनची व 430 हमालांची व्यवस्था करण्यात आली होती हे हमाल ओळखण्यासाठी त्यांना पिवळ्या रंगाची टोपी व ओळखपत्र देण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. मिरवणूक मार्गावरील धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आल्या होत्या.
विसर्जना दरम्यान आरोग्य विभागाकडून विर्सजनाच्या ठिकाणी आलेले 32 मे.टन. निर्माल्य 8 डंपरद्वारे गोळा करण्यात आले. गोळा झालेले निर्माल्य उठाव करून खत प्रक्रिया करण्यास पाठविण्यात आले. मिरवणूक मार्गावर व विसर्जनाच्या ठिकाणी पवडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे व इतर विभागाचे 650 कर्मचारी, 90 टँम्पो 430 हमालासह, 10 डंपर, 24 ट्रॅक्टर ट्रॉली व 5 जे.सी.बी., 7 पाण्याचे टँकर, 2 रोलर, 2 बुम, अशी व्यवस्था करण्यात आली होती.