कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास... पर्यटनासाठी, देवदर्शनासाठी महिलांची गर्दी, सौंदत्तीला जाणाऱ्या कोल्हापूर-सांगलीच्या महिलांनाही लॉटरी
राज्यातील अनेक भागात महिलांच्या गर्दीमुळे जादा बसेस सोडाव्या लागल्या आहेत. धर्मस्थळे, कुक्के सुब्रह्मण्य, शृंगेरी, उडूपी या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अचानक महिला भक्तांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Kolhapur News: कर्नाटकात काँग्रेसने सत्तेत येताच राज्यातील महिलांना मोफत बस प्रवास देण्याची घोषणा केली होती. सत्तेत येताच काँग्रेसने पहिल्याच कॅबिनेटमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केल्यानंतर कर्नाटकात या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील महिलांकडून या निर्णयाने धार्मिक पर्यटनात चांगलीच वाढ झाली आहे. कर्नाटकातील अनेक पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांवर महिलांची गर्दी दिसून येत आहे.
अनेक भागात अतिरिक्त बसेसची मागणी
सरकारने मोफत प्रवास केल्यानंतर राज्यातील अनेक भागात महिलांच्या गर्दीमुळे जादा बसेस सोडाव्या लागल्या आहेत. धर्मस्थळे, कुक्के सुब्रह्मण्य, शृंगेरी, उडूपी या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अचानक महिला भक्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय बेळगावसह राज्यातील अन्य गावातील बस स्थानकावर महिलांची गर्दी अधिक दिसून येत आहे. काही ठिकाणी बससाठी महिलांची वाढती गर्दी पाहून बंदोबस्तासाठी महिला पोलिसांना पाचारण करावं लागले आहे.
महाराष्ट्रात महिलांना अर्ध्या तिकीटावर प्रवास
राज्यात प्रतिसाद मिळाल्यानंतर कर्नाटक सरकारकडून सीमाभागाला लागून असलेल्या राज्यांमध्ये 20 किमीचा प्रवासही मोफत असल्याची घोषणा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकातून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकांना चांगलाच लाभ होणार आहे. कर्नाटक सरकारने केलेल्या नव्या घोषणेनुसार कागल-हुपरीपर्यंत मोफत प्रवास येता येईल आणि त्यानंतर कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या बसने प्रवास करता येईल. महाराष्ट्रात महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो. या निर्णयाचाही महिला चांगलाच लाभ घेत आहेत. कर्नाटक सरकारच्या निर्णयाने सौंदत्तीसाठी जाणाऱ्या कोल्हापूरच्या महिलांनाही फायदा होणार आहे. कागल हुपरीपर्यंत अर्धे तिकीट आणि नंतर कर्नाटक हद्दीत प्रवेश केल्यानंतर बसने मोफत प्रवास करता येईल.
कंडक्टरशी हुज्जत
दुसरीकडे, कर्नाटकात बस प्रवास मोफत झाल्याने प्रवास करताना महिलांकडून ओळखपत्र दाखवण्यासाठी काही महिला कंडक्टर बरोबर हुज्जत घालत असल्याचे दिसून येत आहे. मोफत बस प्रवास केवळ कर्नाटक राज्यात असून आंतरराज्य प्रवास मोफत नाही हे सांगताना कंडक्टरची चांगलीच दमछाक होत आहे. मोफत बस सेवेमुळे रिक्षा आणि वडाप व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या