Kolhapur Crime : शौचालय बिल मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशन! 30 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्याच्या मुसक्या आवळल्या
बांधलेल्या शौचालयांचे बिल मंजूर करण्यासाठी 10 कमिशनने लाच मागणाऱ्या करवीर तालुक्यातील कुर्डू ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्याला लाललूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडत मुसक्या आवळण्यात आल्या.
![Kolhapur Crime : शौचालय बिल मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशन! 30 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्याच्या मुसक्या आवळल्या 10 percent commission for toilet bill approval Gram sevak and panchayat member arrested in kolhapur Kolhapur Crime : शौचालय बिल मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशन! 30 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्याच्या मुसक्या आवळल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/ddaf6214d0b45570bddc56c9b312c53c166445696427088_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Crime : बांधलेल्या शौचालयांचे बिल मंजूर करण्यासाठी 10 कमिशनने लाच मागणाऱ्या करवीर तालुक्यातील कुर्डू ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्याला लाललूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडत मुसक्या आवळण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील ही सलग दुसरी घटना असून कालही फंडाची रक्कम मंजूर करण्यासाठी 23 मागणी केल्याचे समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली होती.
आरोपी महादेव गणपती डोंगळे, ग्रामविकास अधिकारी (कुर्डू ता. करवीर जि. कोल्हापूर) व धनाजी भारती पाटील (ग्रामपंचायत सदस्य, कुर्डू ग्रामपंचायत ता. करवीर जि. कोल्हापूर) यांचेविरूध्द करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बिल मंजूर करण्यासाठी दोघांकडून 10 टक्के कमिशनची मागणी
तक्रारदारांकडे कुर्डू गावातील 2 लाख 99 हजार 437 रुपयांचे सार्वजनिक शौचालय बांधणेचे काम करवीर पंचायत समितीकडून मिळाले होते. त्यांना या कामाचे बिल पंचायत समितीकडून 2 लाख 10 हजार, तर ग्रामपंचायतीकडून 89 हजार 437 रुपये मिळणार होते. मंजूर रकमेपैकी तक्रारदारांना 1 लाख 97 हजार मिळाले होते, व उर्वरित रक्कम कुर्डू ग्रामपंचायतीकडून मिळणार होती.
त्यामुळे तक्रारदारांनी ग्रामसेवक डोंगळेंना भेटून बिलाची मागणी केली असता पंचायत समितीकडून बिल मंजूर केल्याबद्दल तसेच उर्वरित बिलाची रक्कम पंचायतीकडून मिळवून देण्यासाठी एकूण बिलाच्या 2 टक्के कमिशनची मागणी केली. तसेच ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांनी बिल मंजुर करण्यास मदत केली म्हणून त्यालाही कमिशन असे 8 टक्के प्रमाणे पैशाची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदार यांनी ग्रामसेवक डोंगळे व ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील विरोधात लाचलूचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. काल 28 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटीलच्या घरी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता धनाजी पाटीलने स्वत:साठी तसेच ग्रामसेवक डोंगळेसाठी एकूण बिलाच्या 10 टक्के कमिशनने 30 हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ग्रामसेवक महादेव गणपती डोंगळेकडील लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता बिलाच्या 2 टक्के प्रमाणे लाच रक्कमेची मागणी करुन लाच रक्कम स्वत:कडेच देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
दोघांना दोन ठिकाणी सापळा रचून बेड्या ठोकल्या
त्यामुळे डोंगळे विरोधात सापळा रचण्यात आला असता त्याने तक्रारदारांना वाशीमध्ये पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे वाशीमध्ये सापळा रचला असता त्या ठिकाणी डोंगळे 5 हजारांची रक्कम घेताना रंगेहाश सापडला. ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटीलने हळदीत (ता. करवीर) येण्यास सांगितल्यानंतर त्याच्याविरोधातही त्या ठिकाणी सापळा रचला असता 25 हजार रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आदिनाथ बुधवंत, पोलीस उपाधीक्षक, पो.हे.कॉ. शरद पोरे, पो.हे.कॉ. विकास माने, पोकों मयुर देसाई, रूपेश माने सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)