Manoj Jarange Patil: लोकसभेला थोडी फजिती झालेय, आता विधानसभेला आणखी जास्त होईल; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Jalna News: मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीत आमरण उपोषण. उपोषणाचा तिसरा दिवस. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाहीत तर सरकारला आमचा रोष परवडणारा नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
![Manoj Jarange Patil: लोकसभेला थोडी फजिती झालेय, आता विधानसभेला आणखी जास्त होईल; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा Mahayuti got minor setback in Lok Sabha Election 2024 if Maratha Reservation not given Shinde Fadnavis govt will face big loss in Vidhasabha Election 2024 says Manoj Jarange patil Manoj Jarange Patil: लोकसभेला थोडी फजिती झालेय, आता विधानसभेला आणखी जास्त होईल; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/1cb4455663bbcdfd56923359b5b1f4071718000036772954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना: राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे. आता यांची थोडी फजिती झाली आहे, विधानसभा निवडणुकीत आणखी जास्त फजिती होईल, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासाठी 8 जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले होते. ते दररोज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारला इशारे देत आहेत. सोमवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहील. उपोषणाच्या काळातच सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नंतर नको. अन्यथा सरकारला आमचा रोष परवडणारा नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
अजित पवारांच्या भूमिकेचे जरांगे-पाटलांकडून स्वागत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले होते. शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीत मी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलो होतो. त्यावेळी आमची मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. यावर लवकरच आम्ही तोडगा काढू, असे अजित पवार यांनी म्हटले होते. याबाबत जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, मी पहिल्यापासून तेच तर सांगतोय. आम्हाला राजकारण करायचं नाही. आमची लेकरं मोठी झाली पाहिजेत. यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठीच आम्ही जीव जाळतोय, पण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करतोय आम्हाला दुसरं काही अपेक्षित नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंकडे वडेट्टीवारांसाठी मेसेज
काँग्रेस पक्षाचे जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी जरांगे पाटील आणि त्यांच्यात चर्चा झाली. चर्चेदरम्यान जरांगे पाटील कल्याण काळे यांच्याजवळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेविषयी नापसंती व्यक्त केली. एकीकडून गोरगरीब मराठ्यांची मतं घ्यायची आणि एकदा मतं घेतली की, मराठ्याच्या विरोधात बोलायचे. मग विधानसभेला सगळं उलटसुलट होईल. निवडणुकीला भोळ्याभाबड्या मराठ्यांचा फायदा घ्यायचा आणि निवडून आला की तुम्हाला मस्ती येते. मराठ्यांना आरक्षण देऊ देणार नाही, ही भाषा कोणाची आहे. आता तुम्ही निवडून आलात, पण विधानसभेला सगळ्यांना पाडून टाकू. एवढी ताकद गोरगरीब मराठ्यांमध्ये आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मनोज जरांगेंची तब्येत खालावली
मनोज जरांगे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली तेव्हा आपली तब्येत खालावली असल्याचे सांगितले. त्यांच्या डोळ्यांवर ग्लानी दिसत होते. पण मराठा बांधवांनी शेतीची कामं सोडून इकडे येऊ नये. आपल्यासाठी शेती महत्त्वाची आहे. त्यामुळे काम सोडून कोणीही अंतरवाली सराटीत येऊ नका. मी इथे लढायला खंबीर आहे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.
आणखी वाचा
राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार ही कर्माची फळं, निसर्गाचाच नियम : मनोज जरांगे पाटील
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)