Jalna News : खासगी नोकरी सोडून शेती करण्याचं ठरवलं, कष्टाच्या जिवावर लाखोंचं उत्पन्न कमावलं
Farmer Success Stories: शेतकरी तरुणाने खासगी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज तो लाखोंचं उत्पन्न मिळवत आहे.
![Jalna News : खासगी नोकरी सोडून शेती करण्याचं ठरवलं, कष्टाच्या जिवावर लाखोंचं उत्पन्न कमावलं maharashtra News Jalna News Decided to quit private job and start farming Earned lakhs of income through hard work Jalna News : खासगी नोकरी सोडून शेती करण्याचं ठरवलं, कष्टाच्या जिवावर लाखोंचं उत्पन्न कमावलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/19d997cf6f160b4c32f9b9dc3947573a1681303217787443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Farmer Success Stories: शेतकऱ्यांसाठी (Farmers) शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेतल्यास शेती समृद्ध करता येतेच, शिवाय आर्थिक उत्पन्नातही भर पडते. जालना जिल्ह्याच्या (Jalna District) भोकरदन तालुक्यातील तपोवन या गावातील पदवीधर शेतकरी आप्पासाहेब कुंडलिक कढवणे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेडनेटचा लाभ घेतला. याद्वारे बीजोत्पादन करुन ते चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यावरच न थांबता त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी गटाची स्थापन करुन कृषी अवजारे बँक सुरु केली. परिसरात ते आज प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत. विशेष म्हणजे खासगी नोकरी सोडून त्यांनी शेतकरी करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळत आहे.
तरुण शेतकरी असणारे आप्पासाहेब यांच्याकडे 50 गुंठे शेती आहे. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने सुरुवातीला त्यांनी गोवा राज्यातील एका खासगी कंपनीत नोकरी केली. तर कुटुंबातील इतर सदस्य दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत असत. एक भाऊ वाहनचालक म्हणून काम करत होता. अशा बिकट परिस्थितीवर मात करुन वेगळ कार्य करण्याची जिद्द त्यांनी मनात बाळगली. त्यामुळे ते शेती करण्यासाठी गावाकडे परतले. दरम्यान योगायोगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत त्यांच्या गावाची निवड झाली.
बिजोत्पादन करून तीन महिन्यात 70 हजाराचा फायदा
आप्पासाहेब म्हणतात की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून प्रगती साधता येईल, या उद्देशाने मी गावी आलो. या योजनेत शेडनेटसाठी 75 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे कृषी विभागाकडे शेडनेटसाठी अर्ज केला, आणि काही दिवसांतच त्याला मंजुरीही मिळाली. सुरुवातीला 10 गुंठे जमिनीवर शेडनेटचा लाभ घेतला. त्याद्वारे बिजोत्पादन करायला लागलो. तीन महिन्यांत त्यामधून खर्च वजा जाता 70 हजार रुपये आर्थिक फायदा झाला. मागील वर्षात 10 गुंठ्यावरील शेडनेटमध्ये मिरचीचे बीजोत्पादन घेतले. याशिवाय अन्य 10 गुंठयातील शेडनेटमध्ये बीजोत्पादनासाठी टोमॅटोचे रोपन केले आहे. यातूनही चांगले उत्पन्न मिळणार, हे निश्चित असल्याचं ते म्हणाले.
शेतकरी बचत गटातूनही होतोय फायदा...
एकीकडे शेडनेटमधून चांगले उत्पादन मिळत असताना यावरच न थांबता कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार 20 शेतकऱ्यांचा शेतकरी बचत गट स्थापन केला. हिंदवी स्वराज शेतकरी बचत गट असे गटाचे नाव आहे. त्या माध्यमातून कृषी अवजार बँक सुरु केली. त्यासाठी 60 टक्के अनुदान मिळाले. या अवजार बँकेच्या माध्यमातून गावातील शेतीचे कामे अल्पदरात करून दिली जात आहेत. यातून गटातील सर्व सदस्यांना चांगला आर्थिक लाभही मिळत आहे. प्रारंभी खर्च वजा जाता गटाला 2 लाख 10 हजार रुपयांचा फायदा झाला, असे आप्पासाहेब यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)