(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmer Success Story : पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत भाजीपाला शेतीतून लाखोंचं उत्पन्न, परभणीतील प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा
Parbhani News: परभणीतील प्रयोगशील शेतकरी विठ्ठल गणेशराव काकडे यांनी पारंपरिक पिकांना बगल देत भाजीपाला शेती करुन आर्थिक उन्नती साधली आहे.
Parbhani News: पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेतीमध्ये (Farming) नवनवीन प्रयोग करणे आज आवश्यक झाले आहे. सध्या प्रयोगशील शेतीचे दिवस आहेत. जे विकते ते पिकविण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिवसेंदिवस सिद्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करुन, त्यांचे उत्पन्न वाढवण्यास शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. पारंपरिक पिके घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यात वाढ होण्यासाठी नवनवीन कृषी तंत्रांचा, यांत्रिकीकरणाचा पर्याय उपलब्ध करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) पुर्णा तालुक्यातील संदलापूर येथील प्रयोगशील शेतकरी विठ्ठल गणेशराव काकडे यांनी पारंपरिक पिकांना बगल देत भाजीपाला शेती करुन आर्थिक उन्नती साधली आहे. तर भाजीपाला शेतीतून त्यांना आतापर्यंत लाखोंचं उत्पन्न मिळाले आहे.
विठ्ठल गणेशराव काकडे यांनी पारंपरिक पिकांना बगल देत भाजीपाला शेती करुन आर्थिक उन्नती साधली आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत त्यांनी ऑनलाईन अर्ज केला. या योजनेच्या माध्यमातून त्यांना सौर कृषी पंप मिळाला आणि दिवसा शाश्वत सिंचन सुविधेचा विठ्ठल काकडे यांना लाभ मिळाला. याचा फायदा घेत त्यांनी आपल्या शेतात कारले, दोडके, टोमॅटो, कोबी, कांदा, लसूण अशा प्रकारचा भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. यातून त्यांनी आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्याचा आणि रासायनिक खतांचा कमी वापर कसा करता येईल याकडे त्यांचे विशेष लक्ष असते.
कांद्यामध्ये मिरचीचे मिश्र दुहेरी पीक घेतले
विठ्ठल काकडे यांनी भाजीपाला लागवडीतून आतापर्यंत कारले पिकातून एक लाख 12 हजार रुपये, दोडके पिकातून दीड लाख, तर टोमॅटो पिकातून दीड लाख खर्च वगळता अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पादन झाले असल्याचे सांगतात. सध्या त्यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कारले लागवड केली असून, वांग्यामध्ये कोबी, तर कांद्यामध्ये मिरचीचे मिश्र दुहेरी पीक घेतले आहे. यावर्षी एकरी 200 कट्टा कांद्याचे उत्पादन अपेक्षित असून, खेडोपाडी जाऊन ते स्वत:च कांदे विक्री करतात. त्या कांदा विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळत असल्याचे काकडे सांगतात.
पारंपारिक शेतीला जोडधंदा
पुर्णा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अशी काकडे यांची ओळख असून, ते दरवर्षी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाला भेटी देत कृषीविषयक विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होतात. कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांना वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पारंपारिक शेतीला जोडधंदा व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कृषी उत्पन्नात वाढ करावी. मागील अनेक वर्षापासून पारंपरिक शेतीला पूरक अशी फळबाग आणि भाजीपाला शेती यातून नफा मिळवून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी. तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांचा अवलंब करावा, असे विठ्ठल काकडे इतर शेतकऱ्यांना सांगतात.
इतर महत्वाच्या बातम्या: