Chandrakant Khaire: ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन मिळते; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
Chandrakant Khaire: त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
Chandrakant Khaire On Kirit Somaiya: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ आणि साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांच्यावर केलेल्या कारवायामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असतानाम ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ईडीच्या (ED) पैशातून भाजपचे नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) कमिशन मिळत असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
जालना येथे पत्रकारांशी बोलताना खैरे म्हणाले की, किरीट सोमय्या ईडीचा दलाल आहे. ईडीच्या पैशातून सोमय्या यांना कमिशन मिळेल. हे असेच असतात. इन्कम टॅक्सला ज्या खबऱ्याने माहिती दिली, त्या खबऱ्याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते. तसेच याचं काम आहे. ईडीच्या कारवाईबाबत आधीच या भाजपच्या माणसाला कसे काय कळते की, उद्या कोणाकडे धाड पडणार आहे. त्यामुळे काहीतरी मिलीभगत करून भाजप नागरिकांना आणि इतर पक्षाच्या लोकांना त्रास देत आहेत. हे सर्व किरीट सोमय्या हेच करत आहेत. सोमय्या यांची स्वतःची अनेक लफडी आहेत. त्यामुळे सरकार येतात आणि जातात, त्याचे काय होते यांचे पुढे पाहा, असे खैरे म्हणाले.
सोमय्या काय बोलणार?
चंद्रकांत खैरे यांनी यापूर्वी देखील किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप करत खोचक शब्दात टीका केली आहे. खैरे यांच्याकडून सोमय्यांचा नेहमी अरे तुरेने उल्लेख केला जातो. मात्र जालना येथे बोलताना खैरे यांनी ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन मिळते असा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे आता खैरे यांच्या आरोपाला सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी करत कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) मुश्रीफ यांना समन्स बजावण्यात आलं आहे. तर उद्या (12 मार्च) मुंबईमधील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हसन मुश्रीफ यांनी हजर राहावे असे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनिवारी झालेल्या छापेमारीनंतर अवघ्या काही तासांमध्येच ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली. तर तिसऱ्यांदा झालेल्या छापेमारीनंतर मुश्रीफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे उद्या सोमवारी हसन मुश्रीफ हे थेट चौकशीला सामोरे जाणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Dapoli Sai Resort scam : सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडीची कोठडी, घरचं जेवण घेण्यास विरोध