मोठी बातमी : महाजनांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांची लक्ष्मण हाकेंशी चर्चा, सह्याद्रीवर आजच बैठकीचं आयोजन
Laxman Hake : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
Laxman Hake जालना : वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. आज सायंकाळी सह्याद्रीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आता या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, एवढे दिवस उपोषण करणे घातक आहे. सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भूमिका आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ. लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती त्यांनी केली.
ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबत भूमिका घ्या - लक्ष्मण हाके
यानंतर लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबत याबाबत नक्की भूमिका घ्या. आमच्या भवितव्याबाबत सामाजिक मागास घटकांत संभ्रम निर्माण झालाय. हा बांधवांचा रोष आहे, भावना आहे, मी मोठा माणूस नाही, आम्ही दोघे उपोषण करणारे मोठ्या बॅकग्राऊंडचे नसून सामान्य आहोत. आम्हाला कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यामार्फत अथवा कलेक्टरमार्फत तुम्ही निवेदन पाठवून दिले तरी चालेल. आमच्या सर्व नेत्यांनी आणि गावातील लोकांनी एकत्रित बसावे आणि जालना जिल्ह्यातील काही लोकांनी एकत्रित बसून चर्चा करतील, तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, एवढ्या लोकांचा आवाज शासन लोकप्रतिनिधी कसं काय दुर्लक्ष करतात? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी यावेळी शिष्टमंडळाकडे केली. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना लक्ष्मण हाके यांनी मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.
54 लाख नोंदी रद्द कराव्या - नवनाथ वाघमारे
नवनाथ वाघमारे म्हणाले की, आम्हाला कोणाच्या ताटातलं हिसकावून घ्यायचं नाही. आमच्या हक्काच्या आरक्षणाचं बचाव होतो याचं लेखी उत्तर आम्हाला हवं आहे. 54 लाख नोंदी मागच्या दाराने वाटप सुरू आहे, हे तात्काळ बंद झालं पाहिजे, 54 लाख नोंदी रद्द कराव्या. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्रीवर आज बैठकीचं आयोजन
यानंतर गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. आपल्या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या सोबत सविस्तरपणे मुख्यमंत्री बोललेले आहेत. आजच पाच वाजता सह्याद्रीवर बैठकीचे आयोजन सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे, अशी माहिती यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आंदोलकांना दिली. आता या बैठकीत काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .