Donald Trump : 24 तासात भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासात भारतावरील टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी ठेवल्यानं ट्रम्प भडकले आहेत.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे. एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर येत्या 24 तासात टॅरिफ वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की मला वाटतं येत्या 24 तासात भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ वाढवणार आहे. या घोषणेपूर्वी ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवर एक पोस्ट करत भारतावर टीका केली होती. भारताच्या विदेश मंत्रालयानं त्याला प्रत्युत्तर दिलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पोस्ट करत म्हटलं होतं की भारत मोठ्या प्रमाणावर रशियाकडून तेल खरेदी करत आहे, त्याची विक्री करुन चांगला फायदा देखील मिळवत आहे. रशियासोबतच्या व्यापारामुळं भारतावरील टॅरिफ वाढवणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. भारतानं फक्त रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी होत करत नाही तर खरेदी केलेल्या तेलापैकी काही मोठ्या प्रमाणात विक्री करुन नफा मिळवत आहेत. भारताला रशियाच्या युद्धामुळं यूक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत याची पर्वा नाही यामुळं भारतावरील टॅरिफ वाढवत आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ आणि रशियासोबतच्या व्यापाराबाबत जी भूमिका घेतली त्याला भारताच्या विदेश मंत्रालयानं उत्तर दिलं आहे. ट्रम्प यांची भूमिका अयोग्य आणि तर्कहीन असल्याचं भारतानं म्हटलं. विदेश मंत्रालयानं अमेरिकेच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. अमेरिका आतापर्यंत रशियाकडून अणवस्त्र उद्योगासाठी लागणारं यूरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या पॅलेडियम, उर्वरक आणि केमिकलची आयात करतो, असं भारतानं उत्तर दिलं होतं.
भारतावर यापूर्वी 25 टक्के टॅरिफ लादलं
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून विविध देशांवर टॅरिफ लागू करणार असल्याचं जाहीर केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यासोबत भारतावर रशियासोबत व्यापार करत क्रूड ऑईल आणि शस्त्रखरेदी करत असल्यानं दंड लादणार असल्याचं जाहीर केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेला भारताकडून देखील जशास तसं उत्तर दिलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार होत असताना त्यामध्ये कोणत्या गोष्टींवर समझोता होणार ते पाहावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सर्वाधिक टॅरिफ आकारणाऱ्या देशांपैकी एक देश असल्याचं म्हटलं होतं.

























