(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna News: जालन्यातील 'क्रिप्टो' घोटाळ्याची व्याप्ती वाढली, आतापर्यंत 103 तक्रारी दाखल
Jalna News: क्रिप्टो करन्सी कॉइनच्या (Cryptocurrency Coins) नावाखाली आर्थिक फसवणून प्रकरणी आरोपी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्यासह विजय झोल (Vijay Zol) व अन्य साथीदार अजूनही फरार आहेत.
Jalna News: जालन्यात क्रिप्टो करन्सी कॉइनच्या (Cryptocurrency Coins) नावाखाली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. जालना पोलिसांनी या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे जवळपास 103 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारदारांचे जबाब घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून केले जात आहे. सर्वाधिक गुंतवणूक केलेल्या 17 जणांचा पोलिसांनी जबाब घेतला आहे. इतरांचाही जबाब घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्यासह विजय झोल (Vijay Zol) व अन्य साथीदार अजूनही फरार आहेत.
ऋषिकेश काळे यांच्या तक्रारीवरून क्रिप्टो करन्सी कॉइन (जीडीसी कॉइन) प्रमोटर संशयित किरण खरात आणि त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे जवळपास 103 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या 17 जणांनी जवळपास एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांचे पोलिसांनी तातडीने जबाब घेतले आहेत. त्यांच्याकडून बँक पासबूक, आधार कार्ड यासह इतर महत्त्वांची कागदपत्रे घेतली जात आहेत. इतर तक्रारदारांची गुंतवणूक कमी आहे. त्यांचेही जबाब घेतले जात आहे. दरम्यान, ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी तक्रारी करण्याचे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.
साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक
जालन्यात समोर आलेल्या क्रिप्टो करन्सी कॉइन (जीडीसी कॉइन) प्रकरणात साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पुढे आले आहे. तर शिवाय, पोलिसांनी मुख्य कंपनीची वेबसाइट ट्रेस केली आहे. ही वेबसाइट परराज्यातील असल्याचेही सांगण्यात येत आहे. यातील आरोपी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्यासह विजय झोल व अन्य साथीदार हेही फरार झाले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी खरात पतीपत्नीच्या बँक खात्याची माहिती मागविली असून, ते गोठविण्यात येणार आहे.
राजकीय वातावरण तापले!
जालन्यातील क्रिप्टो करन्सी कॉइनच्या घोटाळ्यावरून स्थानिक राजकीय वातावरण देखील चांगलंच तापले आहे. कारण यातील आरोपी विजय झोल हा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावाई आहे. त्यामुळे या घोटाळ्यात खोतकर यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी गंभीर आरोप केले आहे. तर गोरंट्याल यांनीच फसवणूक करणाऱ्या लोकांना मदत केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सी कॉइनच्या घोटाळ्यावरून जालन्यातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
खोतकर आणि त्यांच्या जावयाने 'क्रिप्टो'च्या माध्यमातून मलिदा खाल्ला; गोरंट्याल यांचा पलटवार