(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News: घाटे अळीमुळे हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता; जालन्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
Agriculture News: घाटे अळीच्या नुकसानीची पातळी ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक पध्दतीने हरभऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Agriculture News: अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या संकटातून बाहेर पडत आता शेतकरी रब्बीच्या पीकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाच वातावरण बदलाचा फटका रब्बीच्या पीकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्याप्रमाणात लागवड झालेल्या हरभरा पिकावर सध्या बदलत्या वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे घाटे अळीच्या नुकसानीची पातळी ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक पध्दतीने हरभऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यात यावर्षी रबी हंगामात एकूण सरासरीत हरभरा पिकाचा पेरा सर्वाधिक आहे. वेळेवर झालेली पेरणी व मुबलक पाणी उपलब्ध असल्याने सध्या हरभरा पीक बहरात आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून वातावरात बदल झाल्याने फुलोरा व घाटे लागण्याच्या अवस्थेत असलेल्या या पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लहान आकाराच्या या अळ्या पाने, फुले व कळ्या कुरतडून खात आहेत.
कृषी विभागाचे आवाहन
घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास 30 ते 40 टक्के क्षेत्रावरील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटे अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्कासह जैविक कीटकनाशकांचा वापर करावा, तसेच कृषी विभाग व कृषी विज्ञा केंद्राच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रासायनिक कीटक नाशकांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले आहे.
अशी घ्या काळजी
- शेतातील पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी पक्षी थांबे उभारावेत.
- पिक कळी अवस्थेत आल्यावर अंदाजे पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझेंडिरेक्टिन 300 पीपीम पाच मिली प्रति लिटर पाण्यातून हरभरा पिकावर फवारणी करावी.
- घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी. व्ही. 500 एल. ई. 1 मिली प्रति लिटर पाण्यात 5 ग्रॅम निळ टाकून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.
- किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 5, एसजी 4.4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी 2 मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 1805 एससी 25 मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ!
यंदाच्या हंगामात सुरवातीलाच अतिवृष्टी झाल्याने याचा फटका खरिपाच्या पीकांना बसला होता. त्यातच उरल्यासुरल्या पीकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र परतीच्या पावसाचा फटका बसला आणि तेही हातून गेले. त्यामुळे आता रब्बीत काही हाती लागेल अशी अपेक्षा असतानाच, गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलाचा फटका पीकांना बसत आहे. यामुळे पीकांवर वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: