(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna News : क्रिकेटपटू विजय झोलविरुद्ध गुन्हा दाखल, क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून धमकावल्याचा आरोप
Jalna News : भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalna News : भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा जावई विजय झोल (Vijay Zol) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात उद्योजकाला गुंडाकरवी पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी जालन्यातील (Jalna) घनसांगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विजय झोल याची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
विजय झोल याच्यावर नेमका आरोप काय?
उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन विजय झोलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल याने गुंतवणूक केली होती. परंतु या करन्सीची मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरुन क्रिकेटर विजय झोल आणि त्याच्या भावाने काही गुंड घरी पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटपटू विजय झोल, त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आमदार कैलास गोरंट्याल यांचे खोतकर, झोल कुटुंबावर गंभीर आरोप
दरम्यान, या प्रकरणावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. कैलास गोरंट्याल यांनी काल (16 जानेवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत घेऊन खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. "खोतकर आणि झोल कुटुंबियांनी किरण खरात यांची सुपारी दिली. खोतकर आणि झोल यांच्यावर गुन्हा दाखल करा, मोक्का लावा," शी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं कैलास गोरंट्याला म्हणाले.
क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून फसवणूक, खरात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
दुसरीकडे ज्या खरात दाम्पत्याने विजय झोलसह 15 जणांविरोधात तक्रार दाखल केली, त्यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खरात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किरण खरात आणि त्याच्या पत्नीने तक्रारदाराला ज्यादा पैशाचे अमिश दाखवून साडेबारा लाख रुपयांना गंडा घातला असून यात अनेकांनी मोठी गुंतवणूक केली असून आरोपीने पैसे घेऊन धमकावल्याच आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी किरण खरात आणि त्याच्या पत्नी विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.