
Gulabrao Patil: मंत्रिपद गेले खड्ड्यात, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटील संतप्त
Gulabrao Patil: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणे खपवून घेणार नसल्याचे राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

Gulabrao Patil: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल, भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात संताप व्यक्त होत असताना आता शिंदे गटातील मंत्रीदेखील आक्रमक झाले आहेत. राज्याचे मंत्री गुलाबराब पाटील (Gulabrao Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझे मंत्रिपद गेले तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील याचा जोरदार शब्दात समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटले. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही, मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही असा आक्रमक इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
एकनाथ खडसेंवर टीकास्त्र
जळगाव जिल्हा दूध संघाचे निवडणूक आदेश दोनच दिवसात पुन्हा बदलल्याने त्यावरून एकनाथ खडसेंनी ही लोकशाहीची टिंगल सुरू असून सरकारचा निर्लज्जपणा करत असल्याची टीका केली होती. या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दूध महासंघाच्या सरकारने काढले आहेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढलेले नाहीत. एकनाथ खडसे हे विरोधक असल्याने माझ्यावर टीकाच करतील असेही त्यांनी म्हटले.
संजय राऊतांवर टीका
चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू असल्याचे पाटील यांनी म्हटले. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत त्याने जनतेचे पोट भरत नाही. मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत असल्याचा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.
प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू त्वरित चूक दुरुस्त केली. पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
