(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जळगाव पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानजवळच्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण
प्रशासकीय यंत्रणेवरील रोष व्यक्त करण्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानालगत असलेल्या भिंतीवर अक्षेपार्ह लिखाण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात समोर आल्याने खळबळ उडाली आहे
जळगाव : जळगावात पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थान शेजारील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या भिंतीवर काल (19 जून) hip hop चे स्वागत तर fXXX the system अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. ही बाब लक्षात आल्यावर हा विषय जळगाव शहरात चांगलाच चर्चेला आला. पोलीस अधीक्षकांच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर त्यांनी तातडीने हा मजकूर पुसण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हा मजकूर मिटवण्यात आला. मात्र थेट पोलीस अधीक्षक निवासस्थान परिसरालगतच्या भिंतीवर असा मजकूर लिहून व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय आणि ती व्यक्ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौक परिसरात पोलीस अधीक्षकड डॉ. प्रवीण मुंढे यांचं 'अभय' हे निवासस्थान आहे. काव्य रत्नावली चौक हा कायमच गजबजलेला असतो. या परिसरात पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ असलेली भिंत ही नेहमीच सामाजिक संदेश देण्यासाठी मानवतेची भिंत म्हणून ओळखली जाते. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी हा परिसर आहे. याच परिसरात काल hip hop चे स्वागत तर fXXX the system अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. पोलिसांच्या कारभाराचा निषेध म्हणून हा संदेश लिहिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मजकुरातून संबंधितांनी थेट पोलीस विभागालाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. या प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या निवासस्थानावरुन मेहरुणकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फूटपाथला लागून असलेल्या या भिंतीवर अज्ञातांनी हा आक्षेपार्ह संदेश लिहिला आहे. संबंधित भिंत ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे महापालिकेची मालमत्ता असलेल्या या भिंतीवर विना परवाना अशा प्रकारचा संदेश लिहिल्याने संबंधितांविरोधात डेमोस्ट्रेकली प्रॉपर्टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे वर्दळीच्या चौकात पोलिसांच्याच विरोधात पोलीस अधीक्षकांच्याच बंगल्या शेजारी संदेश लिहण्याची हिंमत केल्याने पोलिसांचा धाक संपला की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.