(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'रावेर लोकसभेत नवा उमेदवार दिला ही चूकच'; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची कबुली, एकनाथ खडसेंवरही साधला निशाणा
Raver Lok Sabha Election 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांच्या विरोधात नवीन उमेदवार दिला ही चूक झाल्याची कबुली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या विरोधात नवीन उमेदवार दिला ही चूक झाल्याची कबुली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील (Satish Patil) यांनी एका कार्यक्रमात दिली आहे. तसेच एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर देखील त्यांनी नाव न घेता टीका केली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यभर गाजली. भाजपच्या रक्षा खडसे यांना रावेरमधून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली होती. श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया मैदानात उतरले होते. तर शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची सून रक्षा खडसेंना भाजपकडून तिकीट जाहीर झाल्याने निवडणुकीतून माघार घेतली. तसेच रक्षा खडसे यांच्यासाठी काम करणार असल्याचे सांगून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची घोषणा केली. अखेर रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला.
रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार दिला ही चूक
या पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार दिला ही चूक झाली असून, आमच्याच लोकांनी आम्हाला फसवून दुसऱ्या पक्षात गेल्याचे सांगत सतीश पाटील यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. आमची फसवणूक झाली नसती तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 9 वे विजय उमेदवार श्रीराम पाटील असते, असा विश्वास देखील सतीश पाटील यांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश कधी?
दरम्यान, रावेर लोकसभा लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसेंना भाजपकडून तिकीट जाहीर झाल्याने खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली. सोबतच रक्षा खडसे यांच्यासाठी काम करणार असल्याचं म्हणत पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तेव्हापासून खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहे. लोकसभेची निवडणुक झाल्यानंतर खडसेंचा भाजप प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र अजूनही त्यांचा भाजप प्रवेश रखडलेलाच आहे. आता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नक्की कधी होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा