(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Airport : जळगावमधील विमान सेवा वर्षभरापासून ठप्प; विमानतळाला टाळे लागणार?
Jalgaon Airport : जळगावमधील विमानतळ सेवा वर्षभरापासून ठप्प असून आता विमानतळ बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Jalgaon Airport : भूमिपूजनाच्या 45 वर्षानंतर प्रवाशांच्या सेवेत रुजू झालेल्या जळगाव विमानतळामागील शुक्लकाष्ठ संपण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. जवळपास एक वर्षापासून विमानतळ सेवा बंद आहे. त्यामुळे आता विमान प्राधिकरण जळगावमधून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे जळगावातील उद्योजक, व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव विमानतळ सेवेत रुजू झाल्यापासून सुरू असलेली घरघर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. 1971 मध्ये भूमिपूजन झालेल्या जळगाव विमानतळावर विमान सेवा सुरू होण्यासाठी जवळपास 45 वर्षांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर डिसेंबर 2017 ला केंद्राच्या उड्डाण योजनेत पहिल्यांदा जळगाव ते मुंबई प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात आली होती. आठवड्यातून तीन दिवस सुरू असलेली विमान सेवा काही काळ वगळता नेहमीच अनियमित सुरू झाल्याने ती असून नसल्यासारखी झाली होती. विमान सेवा चालवण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याचे कारण देत एअर डेक्कनने आपली विमान सेवा बंद केली. त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर त्रू जेट कंपनीने ही विमान सेवा चालविण्यास घेतली होती. मात्र, काही महिने जात नाही तो पर्यंत ही कंपनी सुद्धा तांत्रिक कारण देत विमान सेवेतून बाहेर पडली. जळगाव प्रवासी विमान सेवा बंद होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.
जळगाव विमानतळावर 72 आसनी विमानाला नाईट लँडिंगसह ऑल वेदर सेवा देण्यासाठी सज्ज असलेल्या विमानतल प्राधिकरणाला मात्र विमान सेवा देणाऱ्या कंपन्या प्रतिसाद देत नाही. विमानतळाच्या संचलनासाठी होणारा वर्षाकाठी सहा ते सात कोटी रुपयांचा खर्च होतो. हा तोटा सहन करणे आता कठीण जाऊ लागल्याने विमानतळ प्राधिकरण या ठिकाणाहून आपला गाशा गुंडाळण्याचा तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जळगाव मधील उद्योजक आणि नागरीक चिंतेत पडले आहे
सध्या या विमानतळाचा वापर विमान प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. तरी त्यातून मिळणारे उत्पन्न हे नाममात्र आहे. त्यामुळे विमानतळ सेवा चालवणे परवडणारे नाही. त्यामुळे 50 कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि रोजगाराचा प्रश्न ही निर्माण होत आहे. विमान सेवा सुरू होणे हे कर्मचाऱ्यांच्यासह जळगावच्या विकासा साठी महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे. विमान सेवा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उच्चतम सेवा देऊन आणि नुकसान होणार नाही याची हमी देऊन विमा कंपन्यांना आकर्षित केले जाणार असल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. मात्र, त्यादृष्टीनेदेखील फारशी हालचाल दिसत नसल्याने आशा आता मावळू लागली आहे. त्याच्या परिणामी विमानतळ प्राधिकरण आपला गाशा कधीही गुंडाळू शकते अशी चर्चा जळगावात सुरू आहे.