(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News: जळगाव दूध संघ अपहार प्रकरणी खडसे समर्थक संचालक मंडळाच्या अडचणी पुन्हा वाढणार? पु्न्हा गुन्हे दाखल करण्याचे गिरीश महाजनांचे संकेत
Maharashtra Jalgaon News: जळगाव दूध संघ अपहार प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाविरोधात पुन्हा गुन्हे दाखल करण्याचे संकेत गिरीश महाजनांनी दिले आहेत.
Maharashtra Jalgaon Dudh Sangh: जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon Dudh Sangh) गैरव्यवहार प्रकरणी आधीच एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या समर्थक संचालक तथा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदा खडसे (Manda khadse) यांच्याविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आणखी दुसरा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिले आहेत. यामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाच ते साडेपाच कोटींचा हा घोटाळा असून पैसे भरण्यासंदर्भात माजी सदस्यांना सांगण्यात आलं आहे. पैसे न भरल्यामुळे नाईलाजास्तव येत्या दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल करणार असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी कुणाचंही नाव न घेता म्हटलं आहे.
जळगाव जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी आणखी दुसरा गुन्हा एकनाथ खडसेंवर दाखल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले होते. आता यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनीही माहिती दिली आहे. जळगाव जिल्हा दूध संघात तब्बल साडेपाच कोटींचा घोळ झाला आहे, ही गंभीर बाब आहे, आज जिल्हा दूध संघात झालेल्या बैठकीत जिल्हा दूध संघांचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी संबंधित आजी आणि माजी सदस्यांना पैसे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. पैसे न भरल्यास नाईलाजास्तव दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल करणार असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
जळगाव बाजार समितीची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित युती करुन लढणार आहे. याबाबतची बैठक आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत माहिती दिली. शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यानंतर या निवडणुकीत कुणाचाही डाळ शिजणार नाही, मी मी म्हणणाऱ्यांनाही त्यांची जागा निश्चित दिसेल, असं म्हणत नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना चिमटा काढला. तर आगामी काळातील विधानसभा, नगरपालिका तसेच इतर निवडणुकासुद्धा भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित लढणार असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.
खोटं बोलं पण रेटून बोलं असं चाललंय त्यांचं : गिरीश महाजन
उद्धव ठाकरेंकडे दुसरे कुठलेही मुद्दे नाही, शिळ्या कढीला ऊत याप्रमाणे उद्धव ठाकरे हे तेच तेच भाषण करत आहेत, खोटं बोलं पण रेटून बोलं असं चाललंय. लोक सभा ऐकायला गर्दी करतात, मात्र ही गर्दी उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आलेली नव्हती.आगामी काळात निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा काय आहे ते दिसेल, असं उत्तर मालेगाव येथील सभेत टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. राहुल गांधी सावरकरांवर वारंवार टीका करत आहेत. मात्र उध्दव ठाकरे नुसते त्यांना तंबी देत आहेत, तर एकीकडे तंबी द्यायची आणि तिकडे मांडीवर जाऊन बसायचं, उद्धव ठाकरेंनी तर महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे, अशी टीकाही मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. बाळासाहेबांचं सावरकरांविषयीचं प्रेम आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी सर्व तत्व, हिंदूत्व, सावरकांना गुंडाळून ठेवलंय, असं म्हणत गिरीश महाजनांनी ठाकरेंवर निशाणा साधला.