(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News : जळगावात उष्माघाताचा पहिला बळी, अमळनेरमध्ये महिलेचा उष्माघातामुळे मृत्यू
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. त्याचा फटका अमळनेर येथील महिलेला बसला असून उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.
Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट (Heat Wave) पसरली असून तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्याचा फटका अमळनेर येथील महिलेला बसला असून उष्माघाताने (Heat Stroke) तिचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. रुपाली राजपूत असे या महिलेचे नाव आहे.
भर उन्हात प्रवास करुन परतल्यानंतर उलट्यांचा त्रास
रुपाली या एका विवाह समारंभासाठी अमरावतीला गेल्या होत्या. रेल्वेतून प्रवास करुन त्या भर उन्हात आपल्या घरी आल्या. परंतु काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्रास वाढताच त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरकडून प्राथमिक उपचार करुन घेतले होते. त्यानंतर काही वेळासाठी त्यांना बरंही वाटू लागलं होतं. मात्र काही वेळानंतर त्यांना पुन्हा एकदा उलट्यांचा जास्तच त्रास होऊ लागला आणि त्यांची शुद्ध हरपली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
यंदाच्या मोसमात जळगावातील उष्माघाताचा पहिला बळी
रुपाली राजपूत यांचे निधन झाल्यानंतर त्यांचं शवविच्छेदन केलं असता उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. रुपाली राजपूत या जळगाव जिल्ह्यातील यंदाच्या मोसमातील उष्माघाताच्या पहिल्या बळी ठरल्या आहेत.
रावेरमध्येही महिलेचा मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज
रावेर तालुक्यात देखील नम्रता चौधरी नावाची महिला आपल्या कुटुंबासोबत भर उन्हात नातलगांकडे एका धार्मिक कार्यासाठी गेली होती. परतत असतात बस स्थानक परिसरात उलट्या होऊन आणि चक्कर येऊन ही महिला कोसळली. यानंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात भरती केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एकंदरीत नम्रता चौधरी यांची लक्षणं पाहता त्यांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही