Eknath Khadse : 'राजकीय दबावापोटी आम्हाला आलेली 137 कोटी रुपयांची नोटीस चुकीची', एकनाथ खडेंसाचा दावा
Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना बजावण्यात आलेली 137 कोटी रुपयांची नोटीस चुकीचं असल्याचं म्हणत एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.
जळगाव : राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस आली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाला 137 कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली. या नोटीशीमध्ये एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे तसेच भाजपाच्या (BJP) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचंही नाव असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विभाग विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने एसआयटी स्थापन करण्यात आली होती. एसआयटीच्या पथकाने शासनाकडे अहवाल सादर केला. हा अहवाल स्वीकृत करुन 137 कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईची नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली होती.
एकनाथ खडसेंनी काय म्हटलं?
यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी आम्हाला आलेली नोटीस ही चुकीची असल्याचं म्हटलं. 'राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस आली. आमच्याकडेही पर्याय आहेत. आम्हालाही घोटाळे बाहेर काढता येतात', असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
खडसेंना गुलाबराव पाटलांवर निशाणा
मंत्री गुलाबराव पाटील यांनी या नोटीस प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंवर टीकास्त्र सोडलं होतं. यावर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं, 'गुलाबराव पाटील यांनी केललं भाष्य चुकीचं आहे. गुलाबराव पाटलांचे घोटाळेही आम्हाला बाहेर काढता येतात.' जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोणती कामं सुरु आहेत, असा सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटलांना विचारला. एकनाथ खडसेंना 137 कोटी रुपयांची नोटीस बजावल्यानंतर 'दाल मे कुछ काला है' असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं. त्यावर एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुक्ताई नगर तालुक्यामध्ये सतोड शिवारामध्ये खडसे परिवाराच्या मालकीची 33 एकर जमीन आहे. या जमिनीतून अवैध गौण खनिज उत्सखनन झाल्याचं समोर आलं आहे. याचप्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने चौकशी करुन अहवाल सादर केला. हा अहवाल महसूल विभागाने मान्य करुन त्यांना 137 कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची नोटीस बजावली. या नोटीशीमध्ये एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे तसेच भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचेही नाव असल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान आता एकनाथ खडसेंवर पुढे कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यामध्ये रक्षा खडसे यांना देखील नोटीस बजावण्यात आल्याने आता खडसे कुटुंब कोणती भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, नियमित जामीन मंजूर