(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Khadse : देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत भाजपला सोडचिट्ठी, एकनाथ खडसे चार वर्षांनी स्वगृही परतणार
Eknath Khadse : 2020 साली एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.
Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा लवकरच भाजप (BJP) प्रवेश होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेत्यांची एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करावा अशी विनंती करत असल्याची माहिती एबीपी माझाला (ABP Majha) विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बातचीत केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला रामराम करत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
2020 साली भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश
दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. शरद पवारांनी मला जर राष्ट्रवादीत घेतले नसते तर माझे राजकीय करिअर संपले असते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.
फडणवीसांवर आरोप करत एकनाथ खडसेंनी दिला होता राजीनामा
गेली अनेक वर्षे एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा 2020 साली रंगल्या होत्या. 21 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाराज होऊन आपण पक्ष सोडत असल्याचे सांगितले होते. देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझा हात होता. 2014 पूर्वी मीच विधानसभेत त्यांना माझ्या मागची जागा दिली होती. अनेक चर्चांमध्ये माझ्याऐवजी त्यांना संधी दिली. मात्र नंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केल्याचे खडसे यांनी म्हटले होते. ज्या माणसाला प्रदेशाध्यक्ष करण्यात मोठी मदत केली, त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. पुढे त्यांनीच व्यक्तीगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली, असा हल्लाबोल खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता.
खडसेंमुळे जळगावात भाजपचं वजन वाढणार
आता एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये परतणार असून त्यांच्या येण्याने जळगावमध्ये भाजपला मोठा फायदा होणार आहे. खडसे आता नेमका भाजपत कधी प्रवेश करणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. तर रोहिणी खडसे या आता काय भूमिका घेणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी : होय, मी भाजपमध्ये जातोय, एकनाथ खडसे यांची एबीपी माझाला माहिती!