Jalgaon News: धक्कादायक! दोन नवजात बालकांची अदलाबदल; जळगाव जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार
Jalgaon News: रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेत नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पोलिसांमार्फत डीएनए चाचणीद्वारे हे शिशू आता खऱ्या मातांच्या स्वाधीन केले जाणार आहे,.
Jalgaon News: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. दोन नवजात शिशुंची अदलाबदल झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेत नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पोलिसांमार्फत डीएनए चाचणीद्वारे हे शिशू आता खऱ्या मातांच्या स्वाधीन केले जाणार आहे,. हा प्रकार डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी परिचारिकेच्या चुकीमुळे झाला असल्याचा म्हटले जात आहे. या घटनेमुळे प्रशिक्षित परिचारिकांच्या मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रसूतीसाठी सुवर्णा सोनवणे (वय 20) आणि प्रतिभा भिल (वय 20) या दोन्ही गरोदर महिला भरती झाल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांची प्रकृती खालावत असल्याने तातडीने त्यांच्यावर सिझेरीयन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाकडून घेण्यात आला. शस्त्रक्रिया विभागात पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने दोघींवर सिझेरीयन शस्त्रक्रिया पार पडली. त्यापैकी एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली.
नवजात शिशू पालकांकडे सोपविताना प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थीनीकडून संबंधित पालकांना निरोप देण्यात गोंधळ झाला. यामुळे त्यांची अदलाबदल झाली. काही वेळाने ही चूक उघड होताच प्रसूती कक्षात एकच गोंधळ उडाला. दोन्ही नवजात शिशुंचे पालक आक्रमक झाले. त्यांनी डॉक्टर आणि परिचारिकांना धारेवर धरले. मुलगा व मुलगी नेमकी कोणत्या पालकांची हेच समजत नसल्याने पालकांचा गोंधळ उडत होता.
खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशू आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दोन्ही माता अत्यवस्थ असल्याने अतिदक्षता विभागात दाखल आहेत. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती गठीत केली आहे.
डीएनए चाचणी रक्ताच्या नमु्न्यांच्या आधारे केली जाते. हे नमुने नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभार मुळे आम्हाला मुलगा झाला की मुलगी हे कळायला मार्ग नाही, या ठिकाणी जबाबदारपणे काम व्हायला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे. शिशूंची ओळख पटावी यासाठी आम्ही डीएनए चाचणीची मागणी केली आहे. त्याचा जो अहवाल येईल तो आम्हाला मान्य असणार असल्याचं उमेश सोनवणे या नवजात बालकाच्या पालकाने म्हटले आहे.