(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले उल्हास पाटील लेकीसह भाजपामध्ये प्रवेश करणार, मुंबईत होणार पक्षप्रवेश
काँग्रेस पक्षाने आपल्याला कोणतीही संधी न देता सरळ निलंबित केल्याने आपण व्यथित झालो असून ही काँग्रेस पक्षाची एकाधिकारशाही असल्याचं म्हटले आहे.
जळगाव : काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil) यांनी कन्या डॉ. केतकी पाटीलसह (Ketaki Patil) भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार आहे. मुंबईत पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे. पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. उल्हास पाटील हे 1998 साली काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. मात्र केवळ तेरा महिन्याचा काळ त्यांना मिळाला होता. त्यांनतर मात्र त्यांना मोदी लाटेचा फटका बसल्याने पुन्हा निवडणुकीत ते निवडून आले नाहीत. एके काळी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हयात काँग्रेस पक्षाला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ. उल्हास पाटील यांनी प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. दरम्यान त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या काँग्रेस पक्षासोबत कधीही दिसल्या नाहत. त्या भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगल्या होत्या. या बाबत त्यांच्याकडून मात्र कोणताही अधिकृत दुजोरा दिला जात नव्हता.
डॉ. उल्हास पाटील यांना अचानक निलंबित
रावेर मतदार संघातून त्या भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातं आहे. आज ही त्या या बाबत कोणतंही भाष्य करण्यास तयार नसल्या तरी अनेक महिन्यांपासून त्यांनी रावेर मतदार संघात आपला संपर्क वाढविण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसमध्ये राहिले असेल तरी यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या काँग्रेसमध्ये कधीच दिसल्या नव्हत्या. त्या भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा माध्यमातून येऊ लागल्याने काँग्रेस पक्षातून डॉ. उल्हास पाटील यांना अचानक निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षाने आपल्याला कोणतीही संधी न देता सरळ निलंबित केल्याने आपण व्यथित झालो असून ही काँग्रेस पक्षाची एकाधिकारशाही असल्याचं म्हटल आहे. आपल्या जवळ अन्य पर्याय नसल्याने आपण भाजपामध्ये जात असल्याच म्हटले आहे.
पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर भाजपाची ताकद अजूनच वाढणार
तर आपली कन्या डॉ. केतकीला सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे व्हिजन आवडत असल्याने त्या त्यांच्या भाजपामध्ये जाण्यास इच्छुक राहिल्या होत्या. म्हणूनच त्या आज भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी म्हटले आहे. रावेर मतदार संघात एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांच्यापासूनच भाजपाची घट्ट पकड असताना असताना डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. केतकी पाटील या भाजपामध्ये गेल्यानंतर भाजपाची ताकद अजूनच वाढणार आहे. लोकसभा उमेदवारीसाठी खासदार रक्षा खडसे ,डॉ. केतकी पाटील,अमोल जावळे यांच्यामध्ये चुरस निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत