पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पपईला विक्रमी उच्चांकी भाव, जळगावातील शेतकऱ्याला वर्षातच एकरात सहा लाख रुपये उत्पन्न
जळगाव जिल्ह्यातील करंज गावातील शेतकरी प्रदीप जगन्नाथ पाटील यांना झाला असून केवळ एक एकर क्षेत्रात पपईच्या शेतीतून सहा एकर उत्पादन घेतले आहे.
Agriculture News : एकीकडे कांदा, टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे मात्र केळी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी पातळीवर भाव मिळत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. या विक्रमी भावाचा फायदा जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील करंज गावातील शेतकरी प्रदीप जगन्नाथ पाटील यांना झाला आहे. केवळ एक एकर क्षेत्रात पपई उत्पादनातून त्यांनी चार तोड्यात खर्च वजा जाता सव्वातीन लाख रुपयांची कमाई केली आहे. येत्या काळात त्यांना तेवढेच उत्पन्न येणार असल्याने पपई (Papaya Price) लागवडीतून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप जगन्नाथ पाटील या शेतकऱ्याकडे तीन एकर शेती आहे. यामध्ये एका एकरमध्ये त्यांनी मागील वर्षी मेअखेरीस वी एन आर 15 जातीची पपई रोपांची लागवड केली होती. या प्रकारच्या जातीत व्हायरस येण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यामुळे वी एन आर पंधरा जातीची लागवड त्यांनी केली असल्याचं सांगितलं.
पपई रोपांची लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची चांगली खोलवर नांगरणी करुन आणि रोटावेटर करुन जमिनीची मशागत केली होती. यानंतर दहा बाय सहा या अंतरावर रोपांची लागवड करताना सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा बेसल डोस दिला होता. पपई रोपांना पाणी देण्यासाठी रोपांच्या दोन्ही बाजूला ठिबक नळ्या टाकून रोज आवश्यतेनुसार दोन ते चार तास पाणी दिले होते. पपईवर अळीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बुरशी नाशकसह कीडनाशकाची फवारणी केली होती.
पंचवीस टन पपईचे उत्पादन
प्रदीप पाटील यांनी आपल्या पपई शेतात केलेल्या चांगल्या प्रकारच्या नियोजनामुळे त्यांच्या एक एकर शेतात असलेल्या 750 झाडांना प्रत्येकी 75 किलोपेक्षा अधिक वजनाचा माल लागला आहे. केळीप्रमाणेच उच्च प्रतीच्या पपईला सरासरी भाव पंधरा रुपये किलो मिळत असल्याने पपई उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. प्रदीप पाटील यांच्या शेतातून आजपर्यंत पपईच्या चार वेळा काढण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांना पंचवीस टन पपईचे उत्पादन मिळाले असून सरासरी पंधरा रुपये प्रतिकिलो इतका विक्रमी भाव मिळाला असल्याने या चार तोड्याच्या उत्पादनात त्यांना 3,75,000 इतके रुपये मिळाले आहे. खर्च वाजा जाता 3,25, 000 इतका निव्वळ नफा मिळाला आहे.
एका एकरात सहा लाख रुपयाहून अधिक उत्पन्न
प्रदीप पाटील यांच्या शेतात अजूनही चार ते पाच तोडे पपईचे होणार असल्याने आणि त्यात ही एवढेच उत्पन्न मिळणार आहे. प्रदीप पाटील यांना एका वर्षातच एका एकरात सहा लाख रुपयांहून अधिक उत्पन्न हे पपई पिकातून मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदा केळीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने त्याचा परिणाम म्हणून केळी पाठोपाठ पपईचे दर सुद्धा यंदा विक्रमी पातळीवर असल्याचं पपई व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. यंदा लागवड कमी झाल्याने माल कमी आला आहे. त्यामुळे यंदा पपईला हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, जम्मू, श्रीनगर या ठिकाणी मोठी मागणी आहे. मागणी वाढल्याने प्रति किलो 17 रुपये प्रति किलो इतका विक्रमी पातळीवर भाव मिळत आहे. पुढील काळात तो दर असाच कायम राहील असा अंदाज देखील पपई व्यापारी यांनी व्यक्त केला आहे