Jalgaon Accident : जळगाव : अमळनेर तालुक्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; तीन चिमुकल्यांसह सहा जणांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू
Jalgaon News : जळगावमधील सहा जणांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन बालकांचा समावेश आहे.
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील सहा जणांचा राजस्थानमध्ये कार (Amalner Rajasthan Car Accident) अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने अमळनेर तालुक्यावर (Amalner Jalgaon) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षकांचे कुटुंबीय या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचे नातेवाईक घटना कळताच राजस्थानकडे रवाना झाले आहेत.
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात होते. त्यावेळी कंटेनरला धडक लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे (वय 55, रा. बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे. ता. शिरपूर, हल्ली मुक्काम पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब एका गाडीत आणि दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब एक गाडीत अशा दोन चार चाकींवर राजस्थान फिरायला गेले होते. आज, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला त्यांच्या वाहनाची धडक बसली. डोरीमना गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोनवणे आणि सांळुखे असलेल्या कारने एका कंटेनरला धडक दिली असल्याचे म्हटले जात आहे.
या अपघातात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (5 वर्षे) , गायत्री योगेश साळुंखे (वय 30), प्रशांत योगेश साळुंखे (वय 7), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय 1) यांचा जागीच मृत्यू झाला.
पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सुरेखा ह्या जखमी होत्या. त्यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. धोरिमाण्णा पोलीस ठाण्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह धोरिमान्ना हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, या मृतांचे मृतदेह मंगळवार (दि. 14 नोव्हेंबर) धुळे जिल्ह्यात बेटावद आणि चीमथाणा येथे त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
पंजाबमध्ये भीषण अपघात, 100 कार एकमेकांवर आदळल्या
अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ धुक्यामुळे सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून अपघात घडला. या अपघातात सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अमृतसर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. या अपघाता सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.