Yogi Adityanath Oath : योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, चार वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
योगी आदित्यनाथ हे आज उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी 4 वाजता इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.
Yogi Adityanath Oath Ceremony : आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. योगी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सायंकाळी 4 वाजता इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
आजपासून उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
शपथ घेण्यापूर्वी पूजा
या सोहळ्याला योगगुरु बाबा रामदेव, नुकताच प्रदर्शित झालेला बॉलीवूड चित्रपट 'काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि चित्रपट अभिनेत्री पल्लवी जोशी हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. यूपीमध्ये नवे सरकार स्थापन होण्यापूर्वी आज राज्यभरातील मंदिरांमध्ये पूजा होणार आहे. शपथ घेण्यापूर्वी, भाजपचे कार्यकर्ते राज्यातील शक्ती केंद्रांजवळील मंदिरांमध्ये जाऊन लोककल्याणासाठी पूजा करणार आहेत.
योगींच्या मंत्रीमंडळात कोणाचा समावेश
योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळ जवळपास निश्चित झाले आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर काही नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगींच्या मंत्रिमंडळात अनेक महिला मंत्री असण्याची शक्यता आहे. तसेच अनेक तरुणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून कामकाज सांभाळू शकतात. महेंद्र सिंह, असीम अरुण, राजेश्वर सिंह आणि स्वतंत्र देव सिंह यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री अमित शाह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा
केंद्र सरकारचे मंत्री
भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी
प्रसिद्ध उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित केलं आहे
एवढेच नाही तर या शपथविधी सोहळ्यात देशातील नामवंत उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांशिवाय यावेळी भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनाही या सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रीत केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: