Wrestlers Protest : 'सुनो द्रौपदी...', ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विनेश फोगटने शेअर केली कविता
Vinesh Phogat Tweet : दिल्ली पोलिसांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने कविता शेअर केली आहे.
Wrestlers Protest Against Brij Bhushan Singh : भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या नंतर कुस्तीपटू विनेश फोगटने एक कविता शेअर केली आहे. विनेश फोगटने तिच्या अधिकृ ट्विटर अकाऊंटवरून कवितेचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे.
विनेश फोगटने शेअर केली कविता
कुस्तीपटू विनेश फोगटने शुक्रवारी उत्तर प्रदेशातील एटा येथे राहणारे तरुण कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची प्रसिद्ध कविता 'वुई वॉन्ट जस्टिस' 'सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो' ही ट्विट केली आहे. या शेअर केलेल्या कवितेतील काही ओळी पुढीलप्रमाणे- 'सुनौ द्रौपदी शस्त्र उठा, अब गोविंद ना आएंगे, छोड़ो मेहंदी खड़ग संभालो, खुद ही अपना चीर बचालो...'
'सुनो द्रौपदी...'
#WeWantJustice 🙏 pic.twitter.com/Vf1dQnT7hH
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) June 16, 2023
दिल्ली पोलिसांकडून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल
दिल्ली पोलिसांनी 15 जून रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील POCSO अंतर्गत आरोप रद्द करण्याची शिफारस केली आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात रद्द अहवाल दाखल केला आहे. 4 जुलै रोजी न्यायालय रद्द अहवालावर सुनावणी करणार आहे. तसेच, बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यासाठी न्यायालयाने 22 जूनची तारीख निश्चित केली असून त्यादिवशी सुनावणी पार पडेल.
आंदोलक कुस्तीपटूंची पुढची भूमिका काय?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह शरण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यावर आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिक हिने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, या संपूर्ण प्रकरणावर आरोपपत्र दाखल होण्याची आम्ही वाट पाहत आहोत, त्यानंतरच आम्ही काहीही बोलू शकू, असं तिनं सांगितले.
आरोपपत्राच्या आश्वासनावरून कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं होतं
ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक, ऑलिम्पियन विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक दिग्गज कुस्तीपटू यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोन करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. हे आंदोलन मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी सरकारसोबत चर्चेनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं होतं. 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने आंदोलक कुस्तीपटूंना दिले होते. शासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं होतं.