Jammu Kashmir | अहो आश्चर्यम्! जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची कमान तयार
हा पूल जगातील सर्वात जास्त उंचीचा रेल्वे पूल ठरत असून, याची उंची आयफेल टॉवरपेक्षाही जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. हा पूल जवळपास 359 मीटर उंचीवर आहे.
श्रीनगर : सोमवारी देशात साकारलेल्या सर्वात उंच रेल्वे पुलाच्या आर्च अर्थात कमानीचं काम पूर्ण झालं. जम्मू काश्मीर येथील रियासी जिल्ह्यात हा पूल साकारण्यात आला आहे. भारतात असणारा हा चिनाब ब्रिज आयफेल टॉवरपेक्षाही उंच असल्याचं सांगण्यात येतं. अतिशय महत्त्वाचे निकष अंदाजात घेत तयार करण्यात आलेल्या या पुलामुळं आता काश्मीरचं खोरं देशातील इतर भागांशी जोडलं जाणार आहे.
यूएसबीआरएल प्रकल्पाचा भाग आहे चिनाब पूल
हा पूल जम्मूच्या उधमपूरपासून काश्मीरच्या बारामुलापर्यंत तयार होणाऱ्या रेल्वे रुळ यूएसबीआरएल प्रकल्पाचा भाग आहे. या रेल्वे लाईनमुळं भारतीय सेनेला भारत- चीन सीमेपर्यंत पोहोचणं सोयीचं होणार आहेच. पण, त्यासोबतच चार- पाच तासांनी वेळेचीही बचत होणार आहे. चीनसाठी ही बाब काहीशी अडचणीची ठरु शकते.
आजोबा रणधीर कपूर यांनी Kareena Kapoor च्या दुसऱ्या मुलाचा फोटो चुकून शेअर केला आणि....
आयफेल टॉवरपेक्षाही उंच
नॉर्थन रेल्वेचे जीएम आशुतोष गंगल यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार हा पूल आयफेल टॉवरपेक्षाही 35 मीटर उंच आहे. ज्याची उंची 359 मीटर इतकी आहे.
पूलाची काही वैशिष्ट्य
रेल्वेकडून असा दावा करण्यात आला आहे की, दहशतवादी हल्ल्लानंही या पुलाचं नुकसान होणार नाही. या मार्गावर 100 किमी प्रती तास इतक्या वेगानं रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे 266 प्रति तास इतक्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचाही मारा सहन करणार आहे. 120 वर्षे इतकी या पुलाची वयोमर्यादा सांगण्यात येत आहे. सर्वाधिक तीव्र अशा झोन 5 मध्ये येणाऱ्या भूकंपाचा हादराही सहन करण्याची क्षमता या पुलामध्ये आहे. अतिशय मोठ्या भूकंपामध्ये या पुलाला कमीत कमी नुकसान पोहोचेल पण, फार नुकसान होणार नाही असं सांगण्यात येत आहे.
सर्वाच उंच क्रेनचा वापर
हा पूल साकारण्यासाठी भारतीय रेल्वेकडून इतिहासात आतापर्यंत सर्वात उंच क्रेनचा वापर करण्यात आला आहे. ज्या माध्यमातून स्टीलपासून बनलेले पुलाचे अनेक भाग योग्य ठिकाणी जोडण्यात आले. आता रेल्वे लाईनचा हा डेग तयार होऊन चिनाबच्या कमानीवर साकारल्या जाणाऱ्या पुलाशी जोडला जाऊन त्यावर रुळ बसवण्यात येतील.
In Pics | सकाळी 6 वाजता कोरोना नसतो; दादरमध्ये बेजबाबदारपणाचा कळस
28 हजार कोटी रुपयांचा खर्च
देशातील कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचा भाग जोडणाऱ्या यूएसबीआरएल या प्रकल्पाचा हा पूलही एक भाग आहे. यासाठी 1400 कोटी रुपये खर्ची घालण्यात आले असून, पूर्ण रेल्वेलाईनसाठी 28 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीएमडी संजय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वे लाईन हिमालयातील शिवालिक पर्वतरांग आणि मध्य हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगेतील सर्वात दुर्गम भागातून जाणार आहे. 272 किमीच्या या रेल्वे लाईन परियोजनेमध्ये 28 बोगदे आणि 97 पूल आहेत.
Railways complete the Arch closure of the iconic Chenab Bridge, World's highest railway bridge.
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 5, 2021
Look at the video for the main features of USBRL Project & Chenab Bridge. pic.twitter.com/IdiJtNsdtk
पर्यटन आणि रोजगारात होणार वाढ
चिनाब पुलासाठी 205 किमीचा एप्रोच रोड तयार करण्यात आला आहे. ज्यामुळं रियासी आणि रामबनमधील 70 गावं जोडली गेली आहेत. ज्यामुळं येत्या काळात जम्मू काश्मीर भागात पर्यटन आणि रोजगाराच्या संधीतही वाढ होणार आहे. पर्यटनाला आणखी वाव देण्यासाठी या रेल्वे मार्गावरुन पारदर्शी छत असणारी विस्टाडोम कोच ट्रेन चालणार आहे.