(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Radio Day: विशेष सिग्नेचर ट्यूनची ओळख असणारा, कोट्यवधी लोकांची 'मन की बात' करणारा रेडिओ
World Radio Day: भारतात रेडिओची सुरुवात सर्वप्रथम 1927 साली मुंबईत करण्यात आली. त्यानंतर रेडिओ हे लोकांच्या मनोरंजनाचं आणि शिक्षणाचं माध्यम बनलं.
World Radio Day: ज्यावेळी इंटरनेटचा विकास झाला नव्हता, प्रत्येकाच्या हातात मोबाईल नव्हता, संपर्काची माध्यमं मर्यादित होती त्यावेळी लोकांच्या मनोरंजनाचं एकमेव साधन म्हणजे रेडिओ. केवळ मनोरंजनाचं नव्हे तर शिक्षणाचं माध्यम म्हणून रेडिओकडे पाहिलं जायचं. दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातोय. 2011 साली यूनेस्कोकडून या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. या वर्षीच्या जागतिक रेडिओची थीम ही 'Radio and Peace' अशी आहे.
रेडिओचा इतिहास पाहिला तर जवळपास 112 वर्षांच्या मागे जावं लागेल. भारतात रेडिओची सुरुवात 1927 साली मुंबई आणि मद्रास या ठिकाणी झाली. मुंबई केंद्राचे पुढे 1936 साली ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झालं. तेव्हापासूनचा आजपर्यंतचा रेडिओचा प्रवास थक्क करणारा आहे. इंटरनेटच्या काळात आजही रेडिओ आपलं महत्व टिकवून आहे. पूर्वीच्या AM वरुन त्याचे स्वरुप बदलून आता ते FM मध्ये रुपांतरीत झाल्याचं पहायला मिळतंय. एके काळी ऑल इंडिया रेडिओ किंवा आकाशवाणीचे कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांसाठी मेजवानीच असायची. रेडिओवरील विविध भारतीचे कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारे असायचे.
भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळीही क्रांतिकारकांसाठी रेडिओ हे महत्त्वाचं माध्यम ठरलं. 1942 च्या चले जाव आंदोलनावेळी उषा मेहता यांनी काँग्रेस रेडिओ (Congress Radio) सुरू केलं. गुप्त पद्धतीने मुंबई सुरू केलेल्या या रेडिओने महत्त्वाची कामगिरी बजावली.
स्वांतत्र्यानंतर रेडिओ हेच एकमेव माध्यम असं होतं जे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकत होतं. ऑल इंडिया रेडिओचे अधिकृतरीत्या आकाशवाणी हे नाव 1957 साली ठरवण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. त्या काळात रेडिओने देशाच्या विकासात महत्वाचं योगदान बजावल्याचं दिसतंय.
सिग्नेचर टयून, रेडिओची विशेष ओळख
आकाशवाणीचं प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला सिग्नेचर ट्यून असं म्हटलं जातं. आकाशवाणीची ही सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. 1930 च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील आपली आवड, कामगार सभा, युवावाणी, भावसरगम, वनिता मंडळ आदी सर्वच कार्यक्रमांच्या सिग्नेचर ट्यून्स लोकप्रिय झाल्या. सकाळचे ठीक अकरा वाजले की आकाशवाणी मुंबई कामगार सभा आणि त्यापाठोपाठ उद्घोषकाची कामगारांसाठी अशी सूचना येई आणि मग दिनकर अमेंबल यांनी संगीतबद्ध केलेली श्रवणीय सिग्नेचर ट्यून कानावर पडे.
'मन की बात'
श्रोत्यांच्या मनातील खऱ्या अर्थाने जर कोण बोलत असेल तर ते आकाशवाणी हेच आहे. भारतातील कानाकोपऱ्यात पोहचलेलं एकमेव माध्यम अशी या रेडिओची ओळख आहे. म्हणूनच आपल्या मन की बात या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेडिओची निवड केल्याचं पहायला मिळतंय. 1990 च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणारी आकाशवाणी आपली लोकप्रियता आजही टिकवून आहे.