माजी क्रिकेटपटूच्या अभिनेत्री पत्नीला चोरांची मारहाण
फरहीन यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. जान तेरे नाम, सैनिक या सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत त्या बॉलिवूडपासून दूर आहेत. आपल्या कुटुंबासह त्या दिल्लीत राहत आहेत.

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी अभिनेत्री फरहीन प्रभाकर यांची 'ठक ठक गँग'ने पर्स लांबवल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील पॉश साकेत परिसरात ही घटना घडली आहे. यादरम्यान चोरांनी त्यांना मारहाण केल्याचंही समोर आलं आहे.
फरहीन कामानिमित्त साकेत मॉलमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी ठक ठक गँगच्या चोरांनी त्यांचा मोबाईल आणि पर्स चोरुन तेथून पळ काढला. घटनेदरम्यान चोरांनी आपल्याला ठोसा मारल्याची माहिती फरहीन यांनी दिली. या दुखापतीमुळे फरहीन यांना अॅस्थमाचा झटका आल्याने त्या रस्तावर पडल्या होत्या. मात्र त्यावेळी कुणीही आपल्याला मदत करण्यासाठी पुढे आले नाही, याबद्दल फरहीन यांनी नाराजी व्यक्त केली.
स्वत:ला सावरत फरहीन यांनी फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली असून तपास सुरु केला आहे. मात्र संपूर्ण प्रकारामुळे फरहीन यांना जबर धक्का बसला आहे.
फरहीन यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. जान तेरे नाम, सैनिक या सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत त्या बॉलिवूडपासून दूर आहेत. आपल्या कुटुंबासह त्या दिल्लीत राहत आहेत.























