World War : ...त्यामुळे पडली पहिल्या महायुद्धाची ठिणगी
first world war : पहिल्या महायुद्धाला सर्व युद्धांना समाप्त करणारे युद्ध म्हटले जाते. हे युद्ध इतिहासातील सर्वात प्राणघातक संघर्षांपैकी एक मानले जाते. या युद्धात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
first world war : पहिल्या महायुद्धाच्या आठवणी आज देखील ताज्या आहेत. या युद्धात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या युद्धाच्या आठवणींनी आजही अंगावर शहारे येतात. पहिले महायुद्ध हे युरोपमध्ये झालेले एक वैश्विक युद्ध होते. याची सुरूवात 28 जुलै 1914 रोजी सुरू झाली आणि 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले. परंतु, 1 ऑगस्ट 1914 रोजी खऱ्या अर्थाने पहिल्या महायुद्धाला सुरूवात झाली. कारण याच दिवशी जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
पहिल्या महायुद्धाला सर्व युद्धांना समाप्त करणारे युद्ध म्हटले जाते. हे युद्ध इतिहासातील सर्वात प्राणघातक संघर्षांपैकी एक मानले जाते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, युनायटेड किंग्डम व नंतर इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने) आणि केंद्रवर्ती सत्ता(ऑस्ट्रिया-हंगेरी, प्रशिया (वर्तमान जर्मनी), बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.
पहिल्या महायुद्धाचे कारणे
28 जून 1914 रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियन नागरिकाने हत्या केली. पहिल्या महायुद्धाचे खऱ्या अर्थाने हे तात्कालिक कारण ठरले. आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची देखील हत्या करण्यात आली होती. या हत्येतूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. याबरोबरच युरोपियन राष्ट्रांचा साम्राज्यवाद हे पहिल्या महायुद्धाचे मुख्य कारण मानले जाते.
वसाहतवादाचा स्वीकार
19 व्या शतकात युरोपियन राष्ट्रांनी वसाहतवादाचा स्वीकार केला. स्वतःच्या मालकीची साम्राज्ये असणे, हे राष्ट्रीय प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. यातूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. औद्योगिकीकरण झालेल्या राष्ट्रांना हुकमी बाजारपेठा आणि कच्चा माल पुरवणाऱ्या प्रदेशाची गरज होती. या सत्तास्पर्धेत इंग्लंड - फ्रान्स आघाडीवर होते. जर्मनी आणि इटली सत्तास्पर्धेत उशिरा उतरल्याने युरोपिय राष्ट्रांत कलह वाढून त्याचे पर्यवसान महायुद्धात झाले.
आक्रमक राष्ट्रवाद
आक्रमक राष्ट्रवाद देखील पहिल्या महायुद्धांच्या महत्वाच्या कारणांपैकी एक आहे. आपले राष्ट्र आणि परंपरा सर्वश्रेष्ठ आहे. या साम्राज्यवादी राष्ट्रांच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेतून युरोपात आक्रमक राष्ट्रवाद वाढीस लागला.
राष्ट्राचा प्रादेशिक विस्तार जेवढा मोठा, तेवढी त्या राष्ट्राची शक्ती व प्रतिष्ठा मोठी, अशी युरोपियन राष्ट्रांची समजूत झाली. या समजुतीतूनच जर्मनी, रशिया, ऑस्ट्रियासारखी मोठी राष्ट्रे विस्तारवादी बनली. याच विस्तारवातून पहिल्या महायुद्धाला सुरूवात झाली.
एकराष्ट्रीयत्वाची तीव्र भावना
1870 पर्यंत जर्मनीत अनेक स्वतंत्र संस्थाने होती. त्यामुळे जनतेमध्ये एकराष्ट्रीयत्वाची तीव्र भावना होती. याच काळात प्रशियाचा पंतप्रधान बिस्मार्क याने ऑस्ट्रिया सोडून इतर जर्मन संस्थानांचे एकत्रीकरण बनविण्यात यश मिळविले. त्याने प्रशियाच्या राजाच्या नेतृत्वाखाली आधुनिक जर्मनीची स्थापना केली आणि प्रशियाचा राजा हा जर्मनीचा बादशहा ऊर्फ कैसर बनला. जर्मन राष्ट्राच्या निर्मितीने ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया यांना एक बलवान प्रतिस्पर्धी निर्माण होऊन यूरोपातील बलसमतोल अस्थिर झाला. जर्मनीलाही साम्राज्य-विस्तार करण्याची महत्त्वकांक्षा होती. परंतु जर्मनीच्या निर्मितीपूर्वीच आफ्रिका आणि आशिया यांचा बराच भूभाग ब्रिटन,फ्रान्स आणि रशियाने बळकावलेला होता. जर्मनीनेही त्यांच्या मागोमाग आफ्रिकेतील काही प्रदेश, चीनमधील काही बंदरांत इतर यूरोपीय साम्राज्यवादी राष्ट्रांच्या धर्तीवर विशेषाधिकार व पॅसिफिक महासागरातील काही बेटे मिळविली.
स्पर्धा
नंतरच्या काळात जर्मनीत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले. येथूनच ब्रिटन आणि जर्मनीमध्ये व्यापारी स्पर्धाही सुरू झाली. 1878 साली ऑस्ट्रियाने तुर्कस्तानचे बॉझनिया आणि हेर्ट्सेगोव्हीना हे बाल्कन प्रांत बळकावले होते. तेथे शांतता प्रस्थापित केल्यानंतर ते सोडण्याचे ऑस्ट्रियाने आश्वासन दिले होते. परंतु, तुर्कस्थानात 1908 साली ‘तरूण तुर्क’ या संघटनेने क्रांती केल्यानंतर ऑस्ट्रियाने बॉझनिया आणि हेर्ट्सेगोव्हीना हे बाल्कन प्रांत आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. त्यामुळे बाल्कन विभागातील जनमत प्रक्षुब्ध झाले व स्लॉव्हवंशीय प्रांत बळकविल्यामुळे रशिया नाराज झाला.
...आणि युद्धाची ठिणगी पडली
ऑस्ट्रियाच्या गुप्त पोलीस खात्याने युवराज आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड याच्या हत्येत सर्बीयन सरकारचा हात असल्याचा पुरावा नसल्याचे सांगितले. या राजकीय हत्येमुळे जर्मनी, ऑस्ट्रिया−हंगेरी आणि इटली यांची त्रिराष्ट्रीय युती (ट्रिपल अलायन्स) व फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांची त्रिराष्ट्रीय समहित (ट्रिपल एन्टीटी) यांच्यातील बलसमतोल ढळला. बाल्कन प्रदेशात सत्ताविस्ताराची मनीषा ऑस्ट्रिया−हंगेरीची असल्याने जर्मनीच्या साहाय्याची खात्री बाळगून ऑस्ट्रिया−हंगेरीने 23 जुलै 1914 रोजी सर्बीयाला निर्वाणीचा खलिता पाठविला. सर्बीयाने खलित्यातील सर्व अटी मान्य केल्या नाहीत. 25 जुलै 1914 रोजी सर्बीयाने सेनासज्जता जारी केली. त्यानंतर 28 जुलै रोजी ऑस्ट्रिया−हंगेरीने सर्बीयाविरूध्द युध्द पुकारले. त्यानंतर 1 ऑगस्ट 1914 रोजी जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले. येथूनच पहिल्या महायुद्धाला सुरूवात झाली.