Weather Updates : फेब्रुवारी महिन्यातच पारा वाढला, भीषण गरमीचे संकेत; कसा असेल मे-जून महिना?
Weather Prediction : या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पार प्रचंड वाढलेला पाहायला मिळत आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा भीषण गरमीचा ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Summer Weather Prediction : यंदा नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली. मात्र फेब्रुवारी महिना उजाडताच तापमानात वाढ (Temperature Rise) झालेली पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिना अर्धा संपला असून तापमानात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. घराबाहेर पडलं की, घामाच्या धाराचं लागतात. फेब्रुवारी महिन्यात जाणवणारी गरमी उन्हाळ्याची चाहूल असल्याचं म्हटलं जात आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात झालेली वाढ पाहता यंदाचा उन्हाळ्यात अधिक उष्णतेचा मारा सहन करावा लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
फेब्रुवारीतील वाढलेलं तापमान आणि उष्णता पाहता मे-जून महिन्यामध्ये कडक ऊन पडण्याची चिन्हं असल्याची भीती निर्माण झाली आहे. यंदाचा उन्हाळा कसा असेल, किती ऊन असेल आणि उन्हाळ्याचे काही महिने कसे जाणार आहेत, मे आणि जून महिन्यात तापमान कसं असेल, लोकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या. तसेच फेब्रुवारी महिन्यात तापमान वाढण्याचं कारण काय आहे तेही वाचा.
सध्या तापमानाची स्थिती काय?
फेब्रुवारी महिना सरत आला असून तापमानात वाढ झालेली पाहायली मिळत आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा आणि कर्नाटकात तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. सध्या या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी 35 ते 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान फारसं कमी होणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये तापमान 28-33 अंशांवर पोहोचलं आहे, हे तापमान सामान्य स्थितीपेक्षा पाच ते नऊ अंशांनी जास्त आहे.
फेब्रुवारीमध्ये तापमान वाढण्याचं कारण काय?
यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. काही भागांत अगदी मे महिन्याप्रमाणे उन्हाच्या झळा बसत आहेत. कोणतेही वेस्टर्न डिस्टर्बन्स नसल्यामुळे म्हणजेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव नसल्याने आणि डोंगरावर कमी हिमवृष्टी झाल्यामुळे मैदानी भागात उष्णता वाढत आहे. दरवर्षी फेब्रुवारीत काही ना काही बदल होत असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल लागते. यंदाही फेब्रुवारीत शेवटच्या दिवसांमध्ये काही भागात तापमान घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस पहाटेच्या किमान आणि दुपारच्या कमाल तापमानात सध्याच्या पेक्षा काहीशी घसरण होणार आहे.
कसा असेल उन्हाळा?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा उन्हाळा लवकरच सुरू होणार आहे. यासोबतच पुढचे काही तापमान पुन्हा एकदा घट होणार असून त्यानंतर काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त राहणार असल्याची शक्यता आहे. यासोबतच, यंदा उन्हाळ्यात तापमान खूप वाढू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :