Maharashtra Weather : उन्हाचा चटका कमी होणार, आजपासून पुन्हा थंडी वाढणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज....
Maharashtra Weather : आजपासून (23 फेब्रुवारी) पुढील पाच दिवस राज्यात तापमानात घट होणार आहे.
Maharashtra Weather : सध्या राज्यात तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. थंडीचा जोर कमी होऊन उन्हाचा (Heat) चटका वाढला आहे. दरम्यान, आजपासून (23 फेब्रुवारी) पुढील पाच दिवस पहाटेच्या किमान आणि दुपारच्या कमाल तापमानात सध्याच्या पेक्षा काहीशी घसरण होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा रात्री हलकासा गारवा (Cold Weather) जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. तसेच सध्या दिवसा असलेला उन्हाचा चटका देखील कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर भारतात पावसाची शक्यता
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात दिवसातील दुपारच्या कमाल तापमानात किंचित घसरण झालेली दिसेल. त्यामुळं तेथे दिवसातील उन्हाचा चटकाही कमी होईल. अर्थात हे तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक असू शकते, असे माणिकराव खुळे म्हणाले. 25 फेब्रुवारीपासून नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावातामुळं उत्तर भारतात 25 आणि 26 फेब्रुवारीला गडगडाटीसह पाऊस आणि बर्फीवृष्टीची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. प्रत्यावर्ती वारे थांबले तर या महिन्याच्या अखेरीपर्यंतच्या पाच दिवसात महाराष्ट्रात दोन्ही तापमाने वाढणार नाहीत. परिणामी महाराष्ट्रात आल्हादायक वातावरणाची अपेक्षा असल्याचे खुळे म्हणाले.
काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता
गुजरात आणि कोकणातील कमाल तापमान पाहता, उन्हाळ्याचे वेध लवकर लागलेत असे जरी भासत असले तरीदेखील थंडीला पूरक अशा वातावरणीय घडामोडी संपलेल्या दिसत नाहीत. त्यामुळं अजुनही महाराष्ट्राच्या ठराविक ठिकाणी थंडीची अपेक्षा असल्याचे खुळे म्हणाले. सध्याच्या स्थितीत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची गैरहजरी पाहता महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहून पाऊस अथवा गारपीटीची कोणतीही शक्यता नसल्याचे खुळे म्हणाले.
दुपारी 11 ते 4 या वेळेत काळजी घेण्याचं आवाहन
राज्यभरात थंडीचा जोर कमी झाला आहे. उन्हाळा सुरू झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी आणि कच्छमध्ये उष्णतेचा जोर आहे. काही ठिकाणी 30 च्या पुढे तापमान आहे. त्यामुळं नागरिकांनी दुपारी 11 ते 4 या वेळेत काळजी घेण्याचं हवामान खात्यानं आवाहन केलं आहे. दरम्यान आजपासून उन्हाचा चटका कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी वाढणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :