Raj Thackeray-Uddhav Thackeray: युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, असं स्पष्ट केलं आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर आता मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) युतीचे वारे वाहात आहेत. तसेच उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसून आले. परंतु राज ठाकरेंनी अद्यापतरी युतीबाबत सावध पवित्रा घेतल्याचा पाहायला मिळतंय. विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असं राज ठाकरेंनी अनौपचारिक बोलताना सांगितले. त्यानंतर आज सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंनी या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, 14 आणि 15 जुलै 2025 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्यादरम्यान मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं. त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात-
अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका, असं राज ठाकरे म्हणाले. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा, असं राज ठाकरेंनी सांगितले.
राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन-
पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा 1984 पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की, हे असले प्रकार करू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) July 16, 2025
१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी…
























