Rajiv Satav | राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार?
राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या अचानक जाण्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नवी दिल्ली : दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून कुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर अशी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे तर 4 ऑक्टोबरला या जागेसाठी निवडणूक होणार आहे. या जागेसाठी काँग्रेस नेते मुकुल वासनिक हे सध्या सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसमध्ये महासचिव म्हणून संघटनेचं काम ते पाहत आहेत. शिवाय सोनिया गांधींच्या कोअर टीममधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
दैनंदिन कामकाजाबाबत सोनिया गांधी यांनी जी सल्लागार समिती नेमली आहे, त्यात देखील मुकुल वासनिक आहेत. मागच्या वेळी मुकुल वासनिक आणि राजीव सातव ही दोन नावं शर्यतीत होती. पण राहुल गांधींनी राजीव सातव यांच्या बाजूनं कौल दिला होता. मागच्या वेळी हुकलेली संधी मुकुल वासनिक यांना पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. निधनानंतर घरातच जागा देण्याचा प्रघात लोकसभा, विधानसभेप्रमाणे राज्यसभेसाठी नाहीय. पण राजीव सातव यांचे गांधी घराण्याशी ज्या घनिष्ठ पद्धतीचे संबंध होते ते पाहता त्यांच्यासाठी हा अपवाद केला जातो का? याचीही चर्चा काँग्रेसमध्ये आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी उपाध्यक्ष
राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना नुकतंच राज्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आलंय. गांधी कुटुंबात सातवांच्या राजकीय भविष्याबाबत अंतर्गत काय चर्चा होते यावरच त्यांना राज्यसभा मिळते की अजून इतर कुठली जबाबदारी मिळते हे ठरेल असं काँग्रेसमधून सांगितलं जातंय. महाराष्ट्रातल्या या एका जागेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, राजीव शुक्ला यांचेही प्रयत्न सुरु आहेत. पण आधीच पी चिदंबरम हे महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे अजून एक बाहेरचा उमेदवार महाराष्टातून दिला जाईल का याबद्दल साशंकता आहे.
गुलाम नबी आझाद यांच्यासाठी तामिळनाडूमधून प्रयत्न केले जाऊ शकतात. महाराष्ट्रातून दिल्लीत संघटनेत काम करणारे अविनाश पांडे, रजनीताई पाटील यांचीही नावं चर्चेत आहेत. रजनीताई पाटील यांचं राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत नाव आहे. पण ही यादीच गेले वर्षभर रखडल्यानं राज्यसभेसाठी त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे. सध्या जम्मू काश्मीर या अत्यंत संवेदनशील राज्याचं प्रभारीपद त्या सांभाळत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे, पण सध्या ते राज्यात आमदार असल्यानं त्यांना राज्यसभेवर पाठवून पोटनिवडणुकीचा व्याप पक्ष ओढवून घेईल का याबद्दलही शंका आहे.