महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी उपाध्यक्ष
उपाध्यक्षांच्या यादीत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव समावेश आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी चालवतील हे स्पष्ट आहे.
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्ते यासह अनेक नवे पदाधिकारी या कार्यकारिणीत जाहीर करण्यात आले आहेत. उपाध्यक्षांच्या यादीत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव समावेश आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी चालवतील हे स्पष्ट आहे.
शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती मात्र ना त्यांनी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारलं ना मंत्रीपद.. काँग्रेस कार्यशैली बाबत सोनिया गांधींना पत्र लिहिणार्या 23 जणांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. आता त्यांच्याकडे राज्यात शिस्तपालन कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आला आहे. तर अमरजित मनहास यांच्याकडे खजिनदार पद देण्यात आलं आहे.
कार्यकारणी सोबतच 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीदेखील काँग्रेसने जाहीर केलेल्या आहेत.धवलसिंह मोहिते पाटील सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तर विक्रम सिंह सावंत सांगली ग्रामीणचे अध्यक्ष असणार आहेत. नव्या प्रदेश काँग्रेस कमिटीत जातींचं संतुलन प्रकर्षाने साधल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
190 जणांच्या प्रदेश कमिटीत मराठा-43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एस सी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4 मातंग 4 अशा पद्धतीने वेगवेगळ्या जातींना स्थान देण्यात आलं आहे.. शिवाय प्रादेशिक संतुलनाचा ही विचार करण्यात आला आहे.
महिलांचे प्रतिनिधित्व मात्र तुलनेने कमी आहे 190 जणांच्या कमिटीमध्ये केवळ 17 महिला आहेत. हे प्रमाण नऊ टक्क्यांच्या आसपास आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वारंवार टक्के महिला आरक्षणाची मागणी करत असतात मात्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत त्याचं प्रतिबिंब दिसत नाही.
190 जणांच्या प्रदेश कमिटीत 30-40 या वयोगटातील 17, 41-50 या वयोगटातील 62, 51-60 या वयोगटातील 78, 61-70 या वयोगटातील 32 तर 70 पेक्षा अधिक वय असणारी एक व्यक्ती आहे.