Satish Kumar : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रेल्वे बोर्डच्या अध्यक्षपदी दलित व्यक्ती, कोण आहेत सतिश कुमार?
Indian Railway : सतीश कुमार हे 1986 च्या बॅचचे इंडियन रेल्वे मेकॅनिकल इंजिनिअर्स सर्व्हिसमधील अधिकारी आहेत. आता ते रेल्वेचे पहिले दलित सीईओ असतील.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS) अधिकारी सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाच्या इतिहासात ते अनुसूचित जातीतून आलेले पहिले चेअरमन आणि सीईओ आहेत. बोर्डाच्या विद्यमान अध्यक्षा आणि सीईओ जया वर्मा सिन्हा 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत आणि सतिश कुमार यांची नियुक्ती 1 सप्टेंबरपासून लागू होईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) सतीश कुमार यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून तो निवृत्तीपर्यंत राहील. जया वर्मा यांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
Who Is Satish Kumar : कोण आहेत सतीश कुमार?
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, 1986 च्या बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स (IRSME) अधिकारी सतीश कुमार यांनी त्यांच्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत रेल्वेसाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एप्रिल 2017-2019 या दरम्यान त्यांनी उत्तर रेल्वेवर लखनौ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) म्हणून काम केले. उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी सतीश कुमार यांनी उत्तर पश्चिम रेल्वे, जयपूरमध्ये वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि मुख्य दक्षता अधिकारी पदही भूषवले होते.
सतीश कुमार यांची भारतीय रेल्वेतील अनुभव आणि योगदान लक्षात घेऊन त्यांची MTRS म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. MTRS हे महत्त्वाचे पद आहे जे रेल्वेमधील ट्रॅक्शन आणि रोलिंग स्टॉकच्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवते. त्यानंतर सतीश कुमार आता रेल्वे बोर्डाचे (CRB) अध्यक्ष म्हणून भारतीय रेल्वेचे सर्वोच्च पद भूषवतील.