(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Who Is Nayab Saini : कोण आहेत नायब सिंह सैनी? हरियाणाचे नवे मुख्यमंत्री, खट्टरांच्या निकटवर्तीयांवर भाजपचा विश्वास
Haryana CM Nayab Singh Saini : भाजपचे नायब सिंह सैनी हे आता हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. सैनी खट्टरांचे निकटवर्तीय मानले जातात. कोण आहेत हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, वाचा सविस्तर...
Haryana News : भाजपचे (BJP) नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) हे आता हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. नायब सिंह सैनी यांनी मंगळवारी हरयाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला. भाजपनं जेजेपी पक्षाशी असलेली युती तोडली, यानंतर नायब सिंह सैनी यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हरियाणामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सैनी माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोण आहेत हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, हे वाचा सविस्तर...
नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री
नायब सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नायब सिंह सैनी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर नायब सैनी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
5 कॅबिनेट मंत्र्यांनीही घेतली शपथ
नायब सैनी यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत पाच कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये कंवरपाल गुर्जर, मूलचंद शर्मा, चौधरी रणजित सिंह चौटाला, जय प्रकाश दलाल आणि बनवारी लाल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी गृहराज्यमंत्री अनिल विज संतप्त होऊन तेथून निघून गेले. नायब सैनी यांच्या नावावर त्यांचा आक्षेप होता. विज हे सहा वेळा आमदार असले तरी त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही.
#WATCH | Chandigarh: BJP leader Moolchand Sharma takes oath as minister in the Haryana cabinet. pic.twitter.com/yP8KHk1hZ2
— ANI (@ANI) March 12, 2024
खट्टर यांचे निकटवर्तीय
नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री आहेत. नायब सैनी हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सर्वात जवळचे मानले जातात. दोघेही संघाच्या काळापासून एकमेकांचे खास आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना कुरुक्षेत्रातून तिकीट देण्याचा प्रस्ताव दिल्याचंही सांगितलं जातं. नायब सैनी यांनीही यात आपली प्रतिष्ठा दाखवून दिलीहोती. निवडणूक जिंकून त्यांनी खट्टर यांचा विश्वास कायम ठेवला.
कोण आहेत नायब सिंह सैनी?
नायब सिंह सैनी कुरुक्षेत्रचे भाजप खासदार आहेत. नायब सिंह सैनी अंबाला येथील मिर्जापुर माजराचे रहिवासी आहेत. नायब सैनी यांचा जन्म 25 जानेवारी 1970 रोजी अंबाला येथे झाला, सध्या ते 54 वर्षांचा आहेत. नायब सैनी यांची राजकारणाची सुरुवात भाजपसोबत 1996 पासून झाली. 2002 मध्ये ते युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हा सरचिटणीस बनले. त्यानंतर 2005 मध्ये ते अंबाला येथील युवा मोर्चा भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. नायब सिंह सैनी 2009 मध्ये किसान मोर्चा भाजप हरियाणाचे प्रदेश सरचिटणीस होते. 2012 मध्ये ते अंबाला येथून भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. 2014 मध्ये ते नारायणगड विधानसभेतून आमदार झाले. त्यानंतर 2016 मध्ये ते हरियाणा सरकारमध्ये राज्यमंत्री राहिले. त्याचवेळी ते 2019 मध्ये कुरुक्षेत्रमधून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.